रत्नागिरी: जिल्ह्यातील विविध भागांतून बेपत्ता झालेल्या सहा व्यक्तींचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून, या व्यक्तींविषयी काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. नापत्ता झालेल्या व्यक्तींमध्ये लांजा येथील २५ वर्षीय पंकज प्रकाश जोशी, रत्नागिरी शहरातून बेपत्ता झालेले ३३ वर्षीय विनायक दत्तात्रय अमरे, दापोली येथील ७५ वर्षीय वृद्धा हलिमा महमद झांजु, तसेच मंडणगड तालुक्यातील ३४ वर्षीय जयेश जयराम नाक्ती, ८० वर्षीय राजेश राजाराम साळवी आणि ८५ वर्षीय पांडुरंग रावजी खांबे यांचा समावेश आहे.
संबंधित व्यक्तींच्या वर्णनानुसार, लांजा येथील पंकज जोशी यांची उंची ५ फूट, सावळा रंग आणि बारीक बांधा असून डाव्या हातात पंचरंगी दोरा व चेहऱ्यावर जुन्या जखमांच्या खुणा आहेत. रत्नागिरीतील विनायक अमरे यांची उंची ५ फूट २ इंच, सावळा रंग असून डोक्याच्या पुढील बाजूस टक्कल आहे. दापोली येथील हलिमा झांजु या मध्यम बांधा, साडेचार फूट उंची आणि निमगोरा रंग असणाऱ्या वृद्ध महिला आहेत. मंडणगड येथील जयेश नाक्ती हे सडपातळ बांधा, ५ फूट ३ इंच उंची व सावळा रंग असलेले तरुण असून त्यांच्या संदर्भात ९२२१२३९०१७ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. तसेच मंडणगडचेच रहिवासी असलेले राजेश साळवी हे स्मरणशक्ती कमी झालेले ५ फूट ५ इंच उंचीचे वयोवृद्ध गृहस्थ आहेत, तर पांडुरंग खांबे हे हातात लाकडी काठी आणि पान-सुपारीचा बटवा बाळगणारे साडेचार फूट उंचीचे वृद्ध आहेत. या सहाही व्यक्तींविषयी कोणालाही काही सुगावा अथवा माहिती मिळाल्यास नागरिकांनी विलंब न करता नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवून तपासात सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे.






