रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यात तळागाळातील प्रश्नांवर सातत्याने काम करणारे युवा नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केलेले रूपेशदादा जाधव यांच्यावर आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या उपजिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी दिल्याने रत्नागिरीतील मनसेच्या संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
रूपेशदादा जाधव यांनी गेल्या चार-पाच वर्षांत रत्नागिरी तालुकाध्यक्ष म्हणून पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले आहे. रोजगार, कामगारांचे प्रश्न, रुग्णांना शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमधून मदत मिळवून देणे, रुग्णालयीन खर्च कमी करण्यासाठी पाठपुरावा, रक्तदान शिबिरे तसेच रोजगार मेळाव्यांचे आयोजन अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
कोविड काळात रुग्णांसाठी आयसीयू बेड, औषधे, अन्नपाण्याची सुविधा आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचीही चर्चा झाली होती. चिपळूण पूरस्थितीच्या काळात मदतकार्य, विविध शासकीय आस्थापनांना समाजोपयोगी साहित्याचे वाटप तसेच गरजू नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर दिला.
नोकरी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराशी संबंधित प्रश्नांसह रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्याचा प्रश्न, कोविडनंतर म्युकरमायकोसिसवरील औषधांची उपलब्धता, रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरातील प्रवाशांकडून होणाऱ्या कथित गैरप्रकारांविरोधात कारवाईची मागणी अशा विविध विषयांवर त्यांनी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य मिळावे, मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था दूर व्हावी आणि रत्नागिरीत मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, या मागण्यांसाठीही त्यांनी आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही जाधव यांचा सक्रिय सहभाग राहिला असून मराठी चित्रपटांचे मोफत शो, दहीहंडी उत्सव आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याचे नियोजन, रत्नागिरी विधानसभा संपर्क कार्यालयाची उभारणी आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची पक्षातील जबाबदारी अधिक व्यापक झाली आहे.
नवीन जबाबदारीनंतर रत्नागिरी शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची मजबूत मोट बांधणे, पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे आणि तरुणांना मनसेशी जोडण्यावर विशेष भर देणार असल्याचे रूपेशदादा जाधव यांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः ‘जेन झेड’ अर्थात नव्या पिढीशी संबंधित शिक्षण, रोजगार आणि भविष्यातील संधींचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा त्यांचा मानस आहे.
उच्चशिक्षित, प्रशासनाशी समन्वय साधण्याची क्षमता आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असलेल्या जाधव यांच्यावर आता विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवरील संघटनात्मक जबाबदारी आली आहे. त्यामुळे आगामी काळात रत्नागिरीत मनसेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मनसेच्या संघटनात्मक बांधणीसाठी रूपेश जाधव यांच्यावर नवी जबाबदारी; रत्नागिरी उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
Leave a Comment





