रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे-पाडावेवाडी येथील रहिवासी दशरथ शांताराम बेंडल (वय ५१) यांचा रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोल्हापूर येथील विन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी दशरथ बेंडल हे खेडशी बोगदा परिसरात काम करत असताना रेल्वेची धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तसेच कवटीला फ्रॅक्चर झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.
अपघातानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील विन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच १० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३५ वाजता त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे मिरजोळे-पाडावेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रेल्वेची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा कोल्हापुरात मृत्यू
Leave a Comment




