गावागावांत आता शेतकरी मित्र; राज्यात ११,५८७ पदांची भरती, महिलांसाठी ३० टक्के आरक्षण

Gramin Varta
374 Views

मुंबई : शेतकऱ्यांच्या अडचणी गावपातळीवरच सोडविण्यासोबतच केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात तब्बल ११ हजार ५८७ शेतकरी मित्रांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांना दररोज दोन तास काम करावे लागणार आहे. या कामासाठी शेतकरी मित्रांना दरमहा १ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ५३६ शेतकरी मित्रांची नियुक्ती होणार आहे.

शेतकरी मित्राने गावात शेतकरी सुविधा केंद्र सुरू करणे, ‘आत्मा’ योजनेअंतर्गत महिला व पुरुष शेतीगट, पीकनिहाय शेतकरी गट तसेच महिला अन्न सुरक्षा गट तयार करण्यासाठी मदत करणे आणि या गटांची क्षमता बांधणी करणे अपेक्षित आहे. तसेच शेतीशाळेसाठी शेतकऱ्यांची निवड करणे, कार्यशाळांच्या आयोजनासाठी मदत करणे व त्यामध्ये उपस्थित राहणे, ग्रामसभेत कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणे, ही जबाबदारीही शेतकरी मित्रांवर राहणार आहे.

‘आत्मा’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या नोंदी ठेवणे, गावातील शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन व नियोजन करणे आणि त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कामही त्यांना करावे लागणार आहे. त्यामुळे गावातील शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून शेतकरी मित्र काम करणार आहेत.

तालुक्यातील एकूण शेतकरी मित्रांच्या पदांपैकी ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून, त्यासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सहायक कृषी अधिकाऱ्यांच्या मुख्यालयातील ग्राम कृषी विकास समिती केंद्राकडे सादर करायचे आहेत. अधिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना निवडीत प्राधान्य दिले जाणार आहे.

शेतकरी मित्रांची दर तीन महिन्यांनी बैठक घेण्यात येणार असून, त्यांच्या कामाचे एक वर्षानंतर मूल्यमापन केले जाणार आहे. कामाच्या काळात गैरवर्तणूक आढळल्यास संबंधित शेतकरी मित्राविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवाराला स्वयंप्रेरणेने काम करण्याबाबत बंधपत्रही द्यावे लागणार आहे. मानधनाव्यतिरिक्त कोणताही प्रवास भत्ता किंवा इतर देयके मिळणार नसल्याची तसेच सेवा खंडित झाल्यास किंवा सेवा नियमित करण्याबाबत कोणताही दावा करणार नसल्याची हमी या बंधपत्रातून द्यावी लागणार आहे.

शेतकरी मित्रपदासाठी उमेदवार हा अनुभव व प्रयोगशील शेतकरी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असावे तसेच त्याचे वय २५ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे. संबंधित उमेदवार हा गावातील रहिवासी असण्याबरोबरच त्याच्याकडे स्वतःची शेती असणे आवश्यक आहे. त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसावा आणि तो किमान बारावी उत्तीर्ण असावा. सोशल मीडिया हाताळण्याचे ज्ञान असणे तसेच दररोज दोन तास काम करण्याची तयारी असणेही आवश्यक आहे.

शेतकरी मित्रांची निवड दोन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाणार असून, त्यानंतर त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे गावपातळीवर कृषी योजनांची माहिती, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणींसाठी कृषी विभागाशी जोडणारा स्थानिक दुवा उपलब्ध होणार आहे.

Total Visitors :
4729937
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *