डेपोतून नवीकोरी एसटी बस चोरली; टायर पंक्चर होताच चोरांचा ‘एसटी प्रवास’ अर्ध्यावरच संपला!

Gramin Varta
184 Views

जामनेर : जामनेर एसटी आगारातून चोरट्यांनी नुकतीच दाखल झालेली नवीकोरी एसटी बस चक्क पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. बस घेऊन चोरटे पसार झाले; मात्र काही अंतरावरच बसचा टायर पंक्चर झाल्याने त्यांचा डाव फसला. चोरट्यांनी बस एका गावाजवळ सोडून तेथून पळ काढला. या प्रकारामुळे एसटी आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जामनेर आगारात काही दिवसांपूर्वीच नवीन बस दाखल झाली होती. सोमवारी रात्री आगारातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास बस तिच्या नियोजित जागेवर नसल्याचे आले. त्यानंतर आगार प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. फुटेजमध्ये एक व्यक्ती बसच्या चालकाच्या आसनावर बसून बस रिव्हर्स घेत असल्याचे आणि त्यानंतर ती आगाराबाहेर घेऊन जात असल्याचे दिसून आले.

बस चोरीला गेल्याचे लक्षात येताच आगार प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. बस कोणत्या दिशेने नेण्यात आली याचा माग काढत असताना पोलिसांना ती फार दूरवर गेली नसल्याचे समोर आले. दरम्यान, बसचा टायर पंक्चर झाल्यामुळे चोरट्यांना पुढे जाता आले नाही. अखेर त्यांनी बस एका गावाजवळ सोडून तेथून पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बस ताब्यात घेतली.

बससारखे मोठे वाहन आगारातून बाहेर जात असताना सुरक्षा यंत्रणेच्या ते निदर्शनास कसे आले नाही, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे. आगाराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा व्यवस्था असतानाही बस बाहेर नेण्यात चोरट्यांना यश कसे मिळाले, वाहनांच्या ये-जा नोंदींची तपासणी केली जाते का आणि संबंधित वेळी सुरक्षारक्षकांची नेमकी भूमिका काय होती, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. बस चोरीमागील नेमका उद्देश काय होता, याचाही तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. या घटनेमुळे जामनेर एसटी आगारातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Total Visitors :
4697070
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *