चिपळूण : शालेय वेळेत जिल्हा परिषद, पंचायत समिती अथवा अन्य ठिकाणी जाणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याच्या भूमिकेचे स्वागत करतानाच, शिक्षकांना शाळेबाहेर जाण्याची वेळ का येते, याचाही जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी समाजसेवक एजाज महमूद इब्जी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्रव्यवहार केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी जबाबदारीने काम करत असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीचा आधार नसताना शिक्षकांच्या मार्गदर्शनातून त्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असल्याचे इब्जी यांनी पत्रात नमूद केले आहे.
शिक्षकांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कार्यालयात वारंवार जाण्याची हौस नसते. मात्र सेवा पुस्तके अपूर्ण असणे, रजा मंजुरीची कामे प्रलंबित राहणे, विविध प्रकारची बिले तसेच अन्य कार्यालयीन बाबींची पूर्तता न झाल्यामुळे शिक्षकांना कार्यालयीन कामांसाठी जावे लागते, असा दावा इब्जी यांनी केला आहे. संबंधित कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने अनेकदा शिक्षकांचा वेळ वाया जातो. अशा परिस्थितीत शिक्षकांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात जाऊ नये, अशी अपेक्षा असेल तर त्यांच्या कार्यालयीन प्रश्नांचे निराकरण सुट्टीच्या दिवशी केले जाणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, शिक्षकांवर असलेल्या शाळाबाह्य कामांच्या वाढत्या जबाबदारीकडेही प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे इब्जी यांनी म्हटले आहे. जनगणना, बीएलओची जबाबदारी, विविध सर्वेक्षणे आणि इतर शाळाबाह्य कामांमुळे शिक्षकांचा वेळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामातून जात असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ शकतो, असा मुद्दा त्यांनी मांडला आहे.
शिक्षकांना शाळाबाह्य कामांच्या बोजातून मुक्त करून त्यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अधिक वेळ मिळेल, यासाठी जिल्हा परिषदेने तातडीने ठराव मांडून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी एजाज महमूद इब्जी यांनी केली आहे. शिक्षक शालेय वेळेत बाहेर असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी ते कोणत्या कारणासाठी बाहेर पडतात आणि त्यामागील प्रशासकीय अडचणी कोणत्या आहेत, याचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षक शाळेबाहेर पडतात म्हणून कारवाईपूर्वी शाळाबाह्य कामांचा बोजा कमी करा; एजाज इब्जी यांची जिल्हा परिषदेकडे मागणी
Leave a Comment





