साखरपा/ सिकंदर फरास: कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबा घातात दरड कोसळल्याने आणि मार्ग बंद झाल्यामुळे वाहतूक आता ओणी-रायपाटण-अणुस्कुरा मार्गावरून वळवण्यात आली आहे. या अचानक झालेल्या वळणांमुळे आधीच खड्ड्यांनी पोखरलेल्या आणि अत्यंत दुरवस्थेत असलेल्या या मार्गावर अवजड वाहने, गॅस-इंधन वाहने आणि एसटी बसेसची प्रचंड गर्दी झाली आहे. परिणामी, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी उन्हाळ्यात या मार्गाचे खड्डे बुजवण्यासाठी सुमारे चाळीस लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता, मात्र अवघ्या काही दिवसांतच ते खड्डे पुन्हा उघडे पडल्यामुळे या कामाच्या निकृष्ट दर्जावर आणि प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या नेहमीच मोठी असते, त्यामुळे त्यापूर्वी या धोकादायक व अरुंद मार्गाची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत आणि कोकणवासीयांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी तीव्र मागणी संतप्त वाहनचालक व नागरिकांकडून केली जात आहे.





