आंबा घाटातील रस्ता धोकादायकच; भेगा, खचलेला मार्ग अन् दरीत कोसळलेली संरक्षक भिंत!

Gramin Varta
407 Views

रमेश शिंदे / भडकंबा : संगमेश्वर तालुक्यातील मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड परिसरात रस्ता खचल्याने, रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याने आणि संरक्षक भिंत दरीत कोसळल्याने हा मार्ग अद्यापही वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या धोकादायक परिस्थितीची पाहणी रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संदेश उर्फ बापू शेट्ये यांनी पत्रकार संतोष पोटफोडे व रमेश शिंदे यांच्यासमवेत केली.

पाहणीदरम्यान आंबा घाटातील प्रवासी मार्गाची परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले. ओझरे खिंडीतील रस्ता अनेक ठिकाणी खचला असून मोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगा पडलेल्या ठिकाणाच्या दोन्ही बाजूंना खोल दऱ्या असल्याने वाहनचालकांसाठी धोका अधिक वाढला आहे. त्यातच घाट परिसरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने दुरुस्तीच्या कामातही अडथळे निर्माण होत आहेत.

रस्त्याला पडलेल्या भेगा आणि खचलेल्या भागावर सध्या प्लास्टिक कागदाचे आच्छादन टाकण्यात आले आहे. वाहनधारकांना धोकादायक भागापासून दूर ठेवण्यासाठी सुमारे एक फूट उंचीचा लांबच लांब सिमेंटचा कट्टा बांधण्यात आला असून, लोखंडी पत्र्याच्या साहाय्याने एका बाजूने बंदिस्त करण्यात आले आहे. मात्र, हा तात्पुरता उपाय असून घाटमार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

आंबा घाटातील परिस्थिती पाहता अवजड वाहनांची वाहतूक आधीच बंद करण्यात आली आहे. त्यातच ९ ऑगस्ट २०२६ पासून कोल्हापूर आगारातून आंबा घाट मार्गे येणाऱ्या एसटी बससेवाही बंद करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत असून, दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज घेणेही कठीण होत आहे.

आता गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर प्रवासी दाखल होतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी आंबा घाट वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला होईल का, याबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. घाटातील रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

दरम्यान, आंबा घाट मार्गे रत्नागिरीकडे जाणारी एसटी वाहतूक बंद झाल्याने साखरपा परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रत्नागिरीकडे जाणाऱ्या गाड्या उपलब्ध नसल्याने नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ही गैरसोय लक्षात घेऊन रत्नागिरी आणि देवरुख आगाराने साखरपा मार्गे रत्नागिरीकडे एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. आंबा घाटातील धोकादायक परिस्थिती दूर होईपर्यंत पर्यायी एसटी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

Total Visitors :
4678593
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *