संगमेश्वर येथील नावडी शाळेत ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ अंतर्गत विविध विषयांवर जनजागृती

Gramin Varta
77 Views

संगमेश्वर : संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा संगमेश्वर नंबर २, नावडी येथे आज ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात संगमेश्वर पोलिस निरीक्षक मितेश केणी यांनी विद्यार्थ्यांना विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात शाळेतील वीस मुली, पंचवीस मुले तसेच अंगणवाडीमधील दहा बालके उपस्थित होती. मुख्याध्यापिका प्राची शेरे, शिक्षक रेखा जाधव, अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे, शीतल अंब्रे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रउफ खान आणि उपसंपादक दिनेश अंब्रे यावेळी प्रामुख्याने हजर होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीचे प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, डिजिटल गोपनीयता आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देण्यात आली. याशिवाय वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचे महत्त्व, अल्पवयीन वाहन चालवणे आणि रस्ते सुरक्षेबाबतही विद्यार्थ्यांना सचेत करण्यात आले.

कार्यक्रमात गुड टच आणि बड टच याविषयी मार्गदर्शन करताना चांगला व वाईट स्पर्श यातील फरक, वैयक्तिक सुरक्षितता आणि अनुचित वर्तनाची माहिती विश्वासू व्यक्तींना देण्याबाबत सांगण्यात आले. स्वसंरक्षणाची मूलभूत तंत्रे, आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद आणि आत्मविश्वास वाढवण्याविषयीचे धडेही विद्यार्थ्यांना देण्यात आले. यासोबतच पोलीस दल आणि इतर शासकीय सेवांमधील करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा तसेच कौशल्य विकासाचे महत्त्व यावरही प्रकाश टाकण्यात आला.

- Advertisement -

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध विषयांवर प्रश्न विचारले, ज्यावर उपस्थितांनी त्यांचे शंकानिरसन केले. कायद्याचे पालन, सुरक्षित जीवनशैली, सायबर सुरक्षितता, व्यसनमुक्ती आणि जबाबदार नागरिकत्व याबाबतच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरला.

Total Visitors :
4654148
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *