रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आपले सरकार पोर्टल सेवेत सलग दोन महिन्यांत राज्यात अव्वल

Gramin Varta
87 Views

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम’ अंतर्गत ‘आपले सरकार पोर्टल’ सेवेच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा वेळेत, पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जून २०२६ आणि जुलै २०२६ या सलग दोन महिन्यांत राज्यातील सर्व जिल्हा पोलीस दलांमध्ये अव्वल स्थान मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
शासनाच्या या उपक्रमांतर्गत विविध विभागांच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन केले जाते.

जून २०२६ मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे विविध शासकीय सेवा पुरविण्याबाबत एकूण १,७२३ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १,६१० अर्जांचा वेळेत निपटारा करण्यात आला. या महिन्यात ‘ओव्हरऑल टॉप परफॉर्मिंग सर्व्हिस’ (Overall Top Performing Service) म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून, ‘सर्व्हिस विथ हायेस्ट सिटीझन स्कोर’ (Service with Highest Citizen Score) मध्येही दल राज्यात प्रथम राहिले आहे. आपले सरकार सुविधेद्वारे या कालावधीत करण्यात आलेल्या मूल्यमापनात रत्नागिरी पोलीस दलाने टायमिंगनेस स्कोरमध्ये १५.३२ आणि सिटीझन स्कोरमध्ये १०.७२ इतके गुण मिळवले आहेत.

हीच उल्लेखनीय कामगिरी कायम राखत जुलै २०२६ मध्येही रत्नागिरी पोलीस दलाने आपले प्रथम स्थान अबाधित ठेवले आहे. जुलै महिन्यात दलाकडे १,८०७ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १,७१२ अर्जांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. जुलै २०२६ च्या मूल्यमापनामध्ये ओव्हरऑल टॉप परफॉर्मिंग सर्व्हिस म्हणून पुन्हा एकदा रत्नागिरी पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, सर्व्हिस विथ हायेस्ट सिटीझन स्कोरमध्येही अव्वल स्थान राखले आहे. या महिन्यात टायमिंगनेस स्कोरमध्ये ५०.६४ आणि सिटीझन स्कोरमध्ये ३५.६६ इतके गुण मिळवत पोलीस दल आघाडीवर राहिले आहे.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना वेळेत, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या उद्देशाने ही कामगिरी केली आहे. भविष्यातही नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सदैव प्रयत्नशील राहणार आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4654149
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *