साडवलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने केली यशस्वी सुटका

Gramin Varta
232 Views

संगमेश्वर : तालुक्यातील साडवली (नैदरवाडी) येथे विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला वन विभागाच्या पथकाने यशस्वीरित्या जेरबंद करत सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. या थरारक आणि यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
बुधवारी सकाळी ९ वाजता श्री. राजेश परशराम चव्हाण यांच्या खासगी विहिरीत एक बिबट्या पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. या माहितीनुसार परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख व त्यांचा स्टाफ तात्काळ आवश्यक साहित्यासह घटनास्थळी दाखल झाला. प्रत्यक्ष पाहणी केली असता, सुमारे ५ बाय १२ फूट लांबी-रुंदीची आणि २० फूट खोल असलेल्या या आयातकृती विहिरीत एक बिबट्या पाण्यात पोहत असल्याचे निदर्शनास आले. बिबट्या विहिरीतील भिंतीचा आधार घेऊन पाण्यात थिजला होता.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वन कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना केली. लोखंडी पिंजऱ्याला दोरी बांधून तो विहिरीत सोडण्यात आला. काही क्षणांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याने स्वतःहून पिंजऱ्यात प्रवेश केला आणि तो सुरक्षितपणे जेरबंद झाला. त्यानंतर साडवली येथील तालुका लघु चिकित्सालयाच्या सहायक आयुक्तांकडून बिबट्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. बिबट्या पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

हे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी-चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई, सहायक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये वनपाल संगमेश्वर देवरुख सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सुरज तेली, सुप्रिया काळे आणि प्राणीमित्र अनुराग आखाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या मोहिमेदरम्यान साडवलीचे पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने उपस्थित स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा कोणतीही वन्यजीव अडचणीत सापडल्यास नागरिकांनी त्वरित वन विभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4645742
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *