पाण्याच्या विवंचनेमुळे देवरुख पंचायत समितीसमोर पाच कुटुंबियांचे आमरण उपोषण

Gramin Varta
199 Views

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथील पाच कुटुंबियांनी प्रशासनाकडे आपली कैफियत सातत्याने मांडूनही दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त होऊन गुरुवारी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. राजीवली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कुटगिरी येडगेवाडी येथील १४ कुटुंबियांनी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शासकीय सार्वजनिक विहिरीवरून खाजगी नळपाणी योजना कार्यान्वित केली होती, ज्यामधून अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत सुरू होता.

मात्र, कडाक्याच्या उन्हाळ्यात काही इसमांनी जाणीवपूर्वक पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन तोडून रामचंद्र येडगे, हरिश्चंद्र येडगे, गणपत येडगे, गोविंद येडगे आणि शंकर येडगे या पाच कुटुंबांना पाण्यापासून वंचित ठेवले, ज्यामुळे ऐन पावसाळ्यातही या कुटुंबियांवर पाणी आणण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. कुटुंबातील वयोवृद्ध आई-वडिलांचे हाल होऊ नयेत म्हणून २० जून रोजी या कुटुंबियांनी ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन स्वखर्चाने नवीन नळपाणी योजना करण्याचे ठरवले असता काहींनी त्याला विरोध केला आणि बोअरवेल मारण्यात व्यत्यय आणला, परिणामी एप्रिल महिन्यापासून ही कुटुंबे पाणी विकत आणत असून पिण्याच्या पाण्यासाठी त्यांचे ५० हजारांहून अधिक पैसे खर्च झाले आहेत.

यासंदर्भात तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने, कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, विहिरीतील खाजगी पंप जप्त करणे, सामायिक जमीनळकीतील पाइपलाइन काढणे, खाजगी नळपाणी योजनेला पूर्णत्वास नेणे किंवा शासनाच्या माध्यमातून नियमित पाणीपुरवठा करणे या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी ३० जुलै रोजी सकाळी दहा वाजता हे उपोषण सुरू केले. या उपोषणाला मनसे नेते जितेंद्र चव्हाण आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रभारी गटविकास अधिकारी अक्षय पाटील, नायब तहसीलदार रामभाऊ गिरी आणि उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली तसेच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी येडगेवाडी येथेही भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच असून प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेणार याकडे तालुकावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisement -
Total Visitors :
4610033
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *