आरवली येथे झालेल्या भीषण अपघातप्रकरणी संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल; चालकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा ठपका

Gramin Varta
327 Views

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली येथे मे महिन्यात झालेल्या भीषण अपघातप्रकरणी तपास पूर्ण झाल्यानंतर संगमेश्वर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात झायलो कारचा चालक रोहित दत्ताराम चांदणे (वय ३८, रा. साईनाथनगर, नालासोपारा, जि. पालघर) याचा मृत्यू झाला असून, अन्य आठ जण जखमी झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे २०२६ रोजी पहाटे चारच्या सुमारास झायलो कार (एमएच ४३ एबी २३३२) परेल येथून हर्चे (ता. लांजा) येथे जात असताना आरवली परिसरातील मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्त झाली. वाहनचालक रोहित चांदणे याने वाहन हयगयीने, अविचाराने व बेदरकारपणे चालविल्याने हा अपघात घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला, तर वाहनातील दिपक नारायण पवार, ज्योती दिपक पवार, समर्थ दिपक पवार, दिपक सदाशिव सर्वे, दिप्ती दिपक सर्वे, धनश्री दिपक सर्वे, दिपाली दत्ताराम चांदणे आणि हर्षाली रोहित चांदणे हे जखमी झाले. अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झाले.

या प्रकरणी दिपक नारायण पवार (वय ५१, रा. परेल, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६, १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक ८९/२०२६ दाखल केला आहे. प्राथमिक अकस्मात मृत्यू नोंदीच्या तपासानंतर निष्काळजी वाहनचालकामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4820685
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *