पालक मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्याकडे केलेल्या निवेदनाला यश
सिकंदर फरास/दाभोळे : रत्नागिरी संगमेश्वर क्षेत्रप्रमुख सुदेश सदानंद मयेकर आणि मजगांव सरपंच/प्रशासक फय्याज मुकादम यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांना निवेदन दिले होते.या निवेदनातून नागरिकांच्या मागण्या मांडल्या आहेत.
एस.टी. प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) ०१ ऑगस्टपासून अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे याची अंतिम मुदत वाढवून १ सप्टेंबर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर कार्डचे व्यापक सेंटर नसल्यामुळे आणि कार्डचे रजिस्ट्रेशन केल्यावर ते मिळण्यासाठी १ महिन्याचा कालावधी लागत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्यांनी व्यावसायिक रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना कार्ड मिळेपर्यंत फुल तिकीट काढून प्रवास करावा लागत असून,केवळ कार्डच्या रजिस्ट्रेशन पावतीवर हाफ किंवा फ्री प्रवास मिळावा ही मागणी देखील निवेदनात करण्यात आली होती.
सध्या राज्यात जनगणना,SIR, शाळा,कॉलेज,मेडिकल कॉलेज आणि ॲडमिशनची प्रक्रिया सुरू असून पालकांना कोणत्या खात्याकडे लक्ष द्यावे आणि कुणाचे कागदपत्र आधी पूर्ण करावे, याबद्दल संभ्रम असल्याने पालकांची दमछाक उडाली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये CSC केंद्र (C.S.C. Centre) असून त्यांना NCMC कार्ड काढण्याचे काम दिल्यास ग्रामस्थांना सोयीस्कर होईल.लाडकी बहीण योजनेप्रमाणे ऑनलाइन ॲप निर्माण करावे,जेणेकरून लाभार्थी स्वतःआपले कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करू शकतील.
तसेच वयवर्ष ६५ ते ७५ यातील वयस्कर लोकांचे अंगठ्याचे ठसे येत नसल्याने याकडे देखील परिवहन विभागाने लक्ष घालावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे एस टी प्रशासनाने या सर्व मागण्यावरती लवकरात लवकर लक्ष घालून नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या दूर कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.






