आंबेड बुद्रुक येथे अंतरा फाउंडेशनच्या माध्यमातून काजू कलमांचे वाटप

Gramin Varta
270 Views

संगमेश्वर :महाराष्ट्राचे लाडके नेते आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे अंतरा फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत विविध कृषी विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत काजू फळपिक विकास योजनेतून मागेल त्याला काजू कलमे हा प्रकल्प या वेळी राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत आंबेड, मानसकोंड, कानरकोंड, कोळंबे आणि नावडी आदी गावांमधील पंच्याहत्तरहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना काजू कलमांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री. शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भात व नाचणी पीक विमा, महाविस्तार कृषी ॲप आणि फार्मर आयडी याविषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंबेड बुद्रुक येथील प्रक्षेत्रावर भात चारसूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. शिवाजी शिंदे यांनी शेतकऱ्यांना भात नियंत्रित लागवड, गिरीपुष्प पाल्याचा वापर तसेच युरिया ब्रिकेडचे महत्त्व पटवून दिले. तसेच सर्व शेतकऱ्यांनी भात व नाचणी पीक विमा आवर्जून काढण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी श्री. प्रभाकर कांबळे, कृषी सहाय्यक श्री. यादव आणि श्री. डोंबाळे, विमा सहाय्यक श्री. कांगणे, अंतरा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. नुपुरा मुळ्ये, सचिव श्री. राजेश आंबेकर, उपाध्यक्षा सौ. सरिता आंबेकर, सीआरपी सौ. मेघना मोहिते यांच्यासह शेतकरी लाभार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान परिसरातील सर्व महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून नवनवीन व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Total Visitors :
4580960
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *