कोरोना पुन्हा आला! ‘या’ देशात एकाच महिन्यात तब्बल ७९ हजार रुग्ण आढळल्याने उडाली खळबळ

Gramin Varta
12 Views

दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, एकाच महिन्यात तिथे तब्बल ७९ हजार नवे कोरोना रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचा प्रसार अतिशय वेगाने होत असून, जून महिन्यात सापडलेल्या या रुग्णांपैकी १३० जणांची प्रकृती गंभीर होती तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या चीनचा आरोग्य विभाग या संपूर्ण परिस्थितीवर अतिशय बारीक लक्ष ठेवून आहे. चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार, सध्या देशामध्ये ओमिक्रॉनचा ‘एनबी. १.८.१’ हा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत आहे. जुलै महिन्यातील एका आठवड्यातील आकडेवारीनुसार कोरोना चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर १६.३ टक्क्यांवर पोहोचला असून, बहुतांश रुग्णांमध्ये ताप, घशात खवखव, सर्दी आणि पडसे अशी सौम्य लक्षणे दिसून येत आहेत व अधिकांश रुग्ण पाच ते सात दिवसांत पूर्णपणे बरे होत आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिक जास्त वेळ एअर कंडिशनर असलेल्या बंद जागांवर राहत असल्यामुळे या विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा संसर्ग वाढला असला तरी नवीन व्हेरियंट पूर्वीच्या तुलनेत फारसा गंभीर नसल्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची किंवा मृत्यू पावणारांची संख्या त्याच प्रमाणात वाढलेली नाही, ही एक मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढले असले तरी भारताला सध्या तरी घाबरण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण हा व्हेरियंट पूर्वीसारखा धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र असे असले तरी देशातील आरोग्य तज्ज्ञांनी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले, कमी प्रतिकारशक्ती असलेले नागरिक आणि आधीच गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी आवश्यक ती सर्व खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Total Visitors :
4602487
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *