संगमेश्वर: : एकत्रित ग्रामस्थ – समृद्ध गाव या ध्येयाने कार्यरत असलेल्या देवळे ग्रामविकास मंडळ, मुंबई यांची प्रथम त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी परळ येथील द सोशल सर्व्हिस लीग, एन. एम. जोशी विद्या संकुल येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी मंडळाचे सचिव राकेश गुरव यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून सभेस उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. सभेच्या अध्यक्षपदी संजय काळोखे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर देश, महाराष्ट्र तसेच देवळे गावाच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिवंगत थोर व्यक्तींच्या स्मृतीस अभिवादन करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
सभेमध्ये मंडळाचे सचिव राकेश गुरव यांनी मागील तीन वर्षांच्या कार्याचा आढावा घेणारा त्रैवार्षिक छापील अहवाल सादर करून वाचून दाखविला. मंडळाने मागील तीन वर्षांत केलेल्या विविध सामाजिक, ग्रामविकासात्मक व संस्थात्मक कार्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विठोबा गार्डी, प्रदीप शिंदे, दिनेश साळवी, घागरे आदींनी आपले विचार मांडून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले, त्यानंतर त्रैवार्षिक अहवालास सभेने सर्वानुमते मंजुरी दिली. मंडळाचे खजिनदार रविंद्र पांचाळ यांनी मागील तीन वर्षांतील मंडळाच्या आर्थिक व्यवहाराचा व जमाखर्चाचा सविस्तर आढावा सादर केला. आवश्यक खर्च वजा केल्यानंतर मंडळाकडे सुमारे रु. १ लाखांचा निधी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. मंडळाचा आर्थिक पाया अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात सर्व कार्यकर्ते व सभासदांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनाबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आणि जमाखर्चासही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
मंडळाच्या भावी उपक्रमांवर सभेत सविस्तर चर्चा झाली. मंडळाचे कायदेशीर सल्लागार अॅड. निलेश सकपाळ यांनी मंडळाने प्रस्तावित केलेल्या योजनांचा स्पष्ट आराखडा सभेसमोर मांडण्याची सूचना केली. अध्यक्ष संजय काळोखे यांनी मंडळामध्ये सुरू असलेल्या बीसीच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारामुळे सभासदांना परस्पर आर्थिक मदत मिळत असून मंडळालाही आर्थिक बळकटी मिळत असल्याचे सांगितले. भविष्यात रु. १० हजारांच्या भागांच्या माध्यमातून निधी उभारून, नियमानुसार सभासदांना कर्जरूपाने आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची संकल्पना त्यांनी मांडली. या प्रस्तावावर सभेत साधक-बाधक चर्चा झाली.
विश्वास घाग यांनी कर्जवसुली व आर्थिक शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यावर अध्यक्ष संजय काळोखे यांनी स्पष्टीकरण दिले. विकास परशेट्ये व विठोबा गार्डी यांनीही उपयुक्त सूचना मांडल्या. चर्चेनंतर सदर योजनेस लागू नियम व आर्थिक शिस्तीचे पालन करण्याच्या अटीवर सभेने सर्वानुमते मान्यता दिली.
सभेतील सर्वाधिक महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन कार्यकारिणीची निवड. मागील अनेक वर्षे सचिवपदाची जबाबदारी सांभाळणारे राकेश गुरव यांनी प्रकृतीच्या कारणास्तव तसेच पुरेसा वेळ देता येत नसल्याने सचिवपदाची जबाबदारी बदलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या कार्याचे उपस्थित सभासदांनी कौतुक केले. त्यानंतर संजय काळोखे यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली व सभेने पुढील कार्यकारिणीची एकमताने निवड केली. यामध्ये अध्यक्षा-संजय काळोखे, कार्याध्यक्ष-राकेश गुरव, सचिव-अॅड. निलेश सकपाळ, खजिनदार-रविंद्र पांचाळ, उपाध्यक्ष-बाळकृष्ण चव्हाण व आनंत साळवी, सहसचिव-प्रदीप शिंदे, विश्वास घाग व दिनेश साळवी, संघटक सचिव-मनोहर रातांबे, अजय कदम व गौरी काळोखे, हिशेब तपासनीस-प्रकाश गार्डी, तसेच सल्लागार म्हणून प्रशांत काळोखे व सचिन देवरुखकर यांची निवड झाली.
याशिवाय अनिल साबळे, सविता लाखाटे, अविनाश शिंदे, रविंद्र मुगदार, दिपक काळोखे, विठोबा गार्डी, जितेंद्र साळवी, धीरज पंडित, मंगेश सिदाम, मंगेश कदम, संतोष कदम, उमेश कदम व विष्णू लवून पांचाळ यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीच्या निवडीस उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी देत टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. तसेच जुन्या कार्यकारिणीकडून नवीन कार्यकारिणीकडे मंडळाच्या कामकाजाची व जबाबदाऱ्यांची देवाणघेवाण करण्यासही मान्यता देण्यात आली.
सभेत दिनेश साळवी, प्रदीप शिंदे, विश्वास घाग, विठोबा गार्डी, घागरे, विकास परशेट्ये, अनंत साळवी तसेच कायदेशीर सल्लागार अॅड. निलेश सकपाळ यांनी आपली मते व सूचना मांडल्या. मंडळाने आगामी काळात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व ग्रामविकासाच्या क्षेत्रात अधिक व्यापक उपक्रम राबवावेत, तसेच सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून मंडळाची वाटचाल करावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नवीन अध्यक्ष संजय काळोखे यांनी सर्व सभासदांना विश्वासात घेऊन मंडळाचे कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व संघटित पद्धतीने करण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेचे सर्व कामकाज नियोजित पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर उपस्थित सभासदांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सचिन देवरुखकर यांनी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला आणि श्री सिद्धिविनायक केटरर्सचे मालक संतोष शेट्ये यांच्या माध्यमातून उपस्थितांसाठी स्वादिष्ट व उत्तम दर्जाच्या भोजनाची मेजवानी आयोजित करण्यात आली. सदर भोजन व्यवस्थेबद्दल उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त करून संबंधितांचे मनःपूर्वक आभार मानले. देवळे ग्रामविकास मंडळाच्या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून मंडळाच्या सामाजिक कार्याला नवी दिशा व नवा वेग मिळणार असून, एकत्रित ग्रामस्थ – समृद्ध गाव हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी मंडळ आगामी काळात अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वास सभेत व्यक्त करण्यात आला.






