नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पावरून रास्ता रोको; आमदार सत्यजित तांबेंसह ३०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
5 Views

नाशिक: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा जुना आराखडा बदलण्याच्या हालचालीविरोधात रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. जुन्याच मार्गाने रेल्वे व्हावी या मागणीसाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह ३०० ते ३५० आंदोलकांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग नाशिक, सिन्नर, संगमनेर आणि चाकण मार्गे व्हावा, या प्रमुख मागणीसाठी आमदार सत्यजित तांबे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनामुळे महामार्गावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे आंदोलन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी ही कायदेशीर कारवाई केली आहे.

आंदोलनादरम्यान बोलताना आमदार सत्यजित तांबे यांनी शासनाने जनभावनेचा अनादर करू नये, अशी भूमिका मांडली. नागरिकांची गैरसोय करणे हा आमचा हेतू नव्हता, परंतु ठरल्याप्रमाणे हा रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्याने व्हावा आणि काकोडकर समितीला मुदतवाढ दिली जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केल्यामुळे आंदोलकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4671918
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *