सावर्डे विद्यालयाच्या चिन्मयी शिगवण व पृथ्वी राजभर यांची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
47 Views

चिन्मयीची तिहेरी ‘गोल्डन’ कामगिरी तर पृथ्वीने पटकावला रौप्य क्रमांक

सावर्डे (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत विद्यालयाच्या चिन्मयी शिगवण आणि पृथ्वी राजभर यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत १४, १६ आणि १८ वर्षे वयोगटातील तब्बल ४५४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विविध क्रीडा प्रकारांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची छाप पाडली.

विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी चिन्मयी शिगवण हिने १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात अक्षरशः सुवर्ण कामगिरी केली. तिने ६० मीटर धावणे, ६०० मीटर धावणे आणि लांब उडी या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत तिहेरी सुवर्णपदकाचा मान मिळविला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दि. २७, २८ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

दरम्यान, विद्यालयाचा खेळाडू पृथ्वी राजभर यानेही आपल्या वेगवान धावण्याच्या जोरावर दमदार कामगिरी केली. १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या १००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पृथ्वीने द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या कामगिरीच्या जोरावर त्याचीही राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली असून, आगामी स्पर्धेत तो रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

चिन्मयीची तिहेरी सुवर्ण कामगिरी आणि पृथ्वीचे रौप्य यश यामुळे सावर्डे विद्यालयासह सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दोन्ही खेळाडूंच्या यशाबद्दल सावर्डे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व लोकप्रिय आमदार शेखरजी निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्धजी निकम आणि सेक्रेटरी महेशजी महाडिक यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे तसेच सर्व शिक्षकवृंदांनी चिन्मयी आणि पृथ्वीच्या यशाचे कौतुक केले. या दोन्ही खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे आणि रोहित गमरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी केल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेतही चिन्मयी शिगवण आणि पृथ्वी राजभर यांनी आपल्या कामगिरीची दखल घ्यावी आणि रत्नागिरी जिल्ह्यासह सावर्डे विद्यालयाचे नाव राज्याच्या क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Total Visitors :
4674443
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *