मंडणगड : तालुक्यातील जिपोळे आणि उमरोली जेट्टीदरम्यान सावित्री नदी व बाणकोट खाडीच्या पात्रातील खाजन परिसरात ९ जुलै २०२६ रोजी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, रत्नागिरी पोलिसांनी आता अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून तो पुरुष आहे. त्याच्या अंगावर मळलेला तसेच फाटलेला पूर्ण बाह्यांचा शर्ट, निळ्या रंगाची पूर्ण लांबीची पँट आणि लेदरचा बेल्ट होता. तसेच त्याने निळ्या रंगाची पूर्ण लांबीची अंतर्वस्त्रे परिधान केली होती. मृत व्यक्तीच्या उजव्या मनगटावर निळ्या रंगाचा हृदयाच्या आकाराचा टॅटू असून, त्यामध्ये काही अक्षरे किंवा खुणा कोरलेल्या आहेत. मात्र ती अक्षरे अस्पष्ट असल्याने त्यांचे वाचन होऊ शकत नाही.
या घटनेची माहिती बाणकोट पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मितेश केणी यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिल्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘RAIDS’ अर्थात ‘Rapid AI-based Identification & Detection System’ या ॲपचा वापर करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेहाचे उपलब्ध छायाचित्र RAIDS ॲपवर अपलोड करून त्यावर एआय आधारित प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेतून मृत व्यक्तीच्या उपलब्ध छायाचित्राच्या आधारे संभाव्य स्वरूपाची विविध AI-reconstructed images तयार करण्यात आली आहेत.
ही AI-reconstructed images प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांतून प्रसारित करण्यात येत असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या व्यक्तीबाबत कोणालाही माहिती असल्यास अथवा प्रसारित करण्यात येणाऱ्या AI-reconstructed images वरून व्यक्तीची ओळख पटत असल्यास तात्काळ बाणकोट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे.
बाणकोट खाडीत आढळलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी रत्नागिरी पोलिसांचा ‘RAIDS’ ॲपद्वारे प्रयत्न
Leave a Comment





