रत्नागिरी जिल्ह्यातून ४ हजार २२२ राख्यांचे संकलन; समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या नेतृत्वाखालील उपक्रम ठरला लक्षवेधी

Gramin Varta
65 Views

रत्नागिरी : जिल्ह्यामधील चिपळूण, गुहागर, खेड, लोटे, कराड, सांगली आणि ठाणे या ठिकाणांहून तब्बल चार हजार २२२ राख्यांचे यशस्वी संकलन करण्यात आले आहे. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला असून, या मोहिमेचे पाचवे पर्व अत्यंत लक्षवेधी ठरले आहे. देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि समाजातील विविध घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करणे, या उद्देशाने समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या संकल्पनेतून ही राखी संकलन मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेला चिपळूण आणि गुहागर तालुक्यासह विविध ठिकाणच्या नागरिक, माता-भगिनी, महिला बचत गट तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अवघ्या काही दिवसांत जमा झालेल्या या सर्व राख्या सीमाभागात देशरक्षण करणाऱ्या वीर जवानांकडे रवाना केल्या जाणार असून, याद्वारे कोकणातील बहिणींचे प्रेम आणि सदिच्छा जवानांपर्यंत पोहोचणार आहेत. मोहिमेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल बोलताना समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांनी सांगितले की, सीमेवर कुटुंबापासून दूर राहून आपले रक्षण करणाऱ्या सैनिक भावांसाठी भगिनींनी मोठ्या मायेने या राख्या सुपूर्द केल्या असून, कोकणच्या बहिणींनी नेहमीच देशप्रेमाच्या कार्यात पुढाकार घेतला आहे. नागरिकांच्या या भरघोस प्रतिसादामुळे सामाजिक जबाबदारी अधिक वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या देशप्रेमाने प्रेरित असलेल्या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून जोरदार कौतुक होत असून, लिटिल चॅम्प्स इंग्लिश स्कूल जानवळेचे मुख्याध्यापक हेमंत शिरकर, दलवाई हायस्कूल मिरजोळीचे मुख्याध्यापक रोहित जाधव आणि श्री सत्यनारायण मित्रमंडळ कादवड तांबडवाडी समाज मंदिराचे नितीन शिगवण यांच्यासह उत्तम नियोजन केलेल्या तीन ठिकाणी विशेष अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी, युवक, महिलांसह माजी सैनिक संभाजी चव्हाण, सुनील खरात, विद्यमान सैनिक इकबाल चिपळूणकर, राजेश कोकरे, विजय खरात, साद कडवेकर, जितेंद्र कांबळे, ओंकार उदेग, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद वनगे, सुधीर मोरे, समीर कदम, नितीन शिगवण, संदीप मोहिते, सुशांत मोहिते, सतीश गजमल, अनिल पिनगे, वैभव मोहिते, विवेक जाधव, राहुल कदम, रेशमा कदम, सुचिता तांबे, साहिल तांबे, विशाल मोहिते, महेश मोहिते, तसेच उद्योजक हेमंत जाधव आणि उद्योजक मनोहर मोहिते आदींनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव खाडे यांनी केले, सूत्रसंचालन सचिन पवार यांनी तर छायाचित्रण आकाश मोहिते यांनी पार पाडले. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे, शैक्षणिक संस्था आणि नागरिक या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4674541
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *