रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्जमुक्तीची अधिकृत यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील २ हजार ८३२ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तब्बल १२ कोटी ९३ लाख ६८ हजार ६७८ रुपयांचा निधी बँकांमध्ये जमा झाला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी दिली.
शासनाने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी पहिला हप्ता कर्जखात्याला वितरित केला आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सह बँकेत ६ कोटी ८१ लाख ९४ हजार तर इतर राष्ट्रीय, ग्रामीण, पत बँकांमधील खात्यात ६ कोटी ११ लाख ७४ हजार ६७८ रुपयांचा निधी वितरित केला आहे. अजूनही पात्र शेतकऱ्यांची यादी पडताळणीचे काम सुरु आहे. पुढचा हप्ता पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. सर्व पात्र शेतकरी बंधूंनी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. त्याशिवाय या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे आवाहन त्यांनी केले आहे.






