लांजा तालुक्यातील विविध विकास कामांबाबत आमदार किरण सामंत यांची आढावा बैठक संपन्न

Gramin Varta
171 Views

लांजा : लांजा तालुक्यात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण विकास, जलजीवन मिशन, दरड प्रणव क्षेत्र खारभूमी, पर्यटन स्थळे तीर्थक्षेत्र स्मशानभूमी कातशिप कब्रस्तान बंधारे संरक्षण भिंत, धुप प्रतिबंधात्मक बंधारे, ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, सिंचन, महसूल, नगरपंचायत तसेच इतर विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. तालुक्यातील सुरू असलेली विकासकामे, प्रलंबित प्रस्ताव, निधीची उपलब्धता, कामांची सद्यस्थिती तसेच नागरिकांच्या तक्रारी व अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील रस्ते, पूल, पिण्याच्या पाण्याच्या योजना, शैक्षणिक सुविधा, आरोग्य केंद्रे, अंगणवाडी इमारती, ग्रामपंचायत कार्यालये, पर्यटन विकास, शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्यावर भर देण्यात आला. शासनाने मंजूर केलेल्या निधीचा योग्य वापर करून विकासकामांना गती देण्याचे निर्देशही आमदार सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीच्या शेवटी विविध विभागांना निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विकासकामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाणार असून, नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान पद्धतीने कार्य करावे, असे आवाहनही आमदार किरण सामंत यांनी केले.

या आढावा बैठकीमुळे लांजा तालुक्यातील विविध विकासकामांना अधिक गती मिळणार असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Total Visitors :
4660556
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *