चिपळूण: सोनगाव नाला प्रदूषण प्रकरण: दोन्ही नाल्यांवर ‘वॉटर मॉनिटरींग सिस्टीम’ बसवणार; प्रदूषण नियंत्रण मंडळाची लेखी हमी

Gramin Varta
4 Views

चिपळूण : येथील सोनगावमधील नाला प्रदूषणप्रकरणी गुरुवारी खेर्डी येथील एमआयडीसी कार्यालयात प्रशासन, उद्योग प्रतिनिधी आणि ग्रामस्थांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. तीव्र आंदोलनानंतर प्रथमच झालेल्या या बैठकीत सोनगाव ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन तोडग्याच्या दिशेने पहिले ठोस पाऊल पडले आहे.

या बैठकीत सोनगावमधील दोन्ही नाल्यांवर ऑनलाइन वॉटर मॉनिटरींग सिस्टीम बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या आधुनिक प्रणालीद्वारे नाल्यातील पाण्याच्या गुणवत्तेवर सतत ऑनलाइन देखरेख ठेवली जाणार असून प्रदूषणाची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. तसेच, ‘ए’ संपमधून कोणत्याही परिस्थितीत दूषित पाणी सोडले जाणार नाही, अशी स्पष्ट लेखी हमी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ग्रामस्थांना देण्यात आली आहे. या हमीमुळे भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि प्रशासन अधिक जबाबदारीने काम करेल, अशी तीव्र अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, प्रदूषणामुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांच्या नुकसानभरपाईबाबत सध्या कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नसल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले. मात्र, संबंधित उद्योग, एमआयडीसी आणि प्रशासनाशी समन्वय साधून यावर लवकरात लवकर योग्य तोडगा काढला जाईल, असे ठोस आश्वासन बैठकीत देण्यात आले. आंदोलनानंतर झालेल्या या चर्चेत तीन महत्त्वाच्या मुद्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याने सोनगावच्या प्रदूषण समस्येवर लवकरात लवकर शाश्वत उपाय निघेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या संयुक्त बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सतीश पवार, उपअभियंता पिंपळे, हळदणकर, सीईटीपीचे व्यवस्थापक भूषण शिंदे, लोटे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंब्रे यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख राजू घाग, पंचायत समिती सदस्या रेवती घाग, सोनगावच्या सरपंच भारती पडवळ, उपसरपंच मिलींद घोरपडे, पर्यावरण समितीचे अध्यक्ष विष्णू साळुंखे, उपाध्यक्ष संदीप घाग, प्रथमेश घाग, दत्ताराम घाग, दाभोळखाडी संघर्ष समितीचे सल्लागार दिलीप दिवेकर, प्रमोद माळी, शेखर मोरे, विनायक घाग आणि शंकर अदावडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -
Total Visitors :
4661207
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *