महामार्ग सुरू होण्यापूर्वीच रस्ता खचला; संतप्त नागरिकांचा ठेकेदाराला चोप देण्याचा इशारा
चिपळूण : मुंबई गोवा महामार्महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेतील धोकादायक खड्ड्यांमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी बेकरीसमोरील याच खड्ड्यात दुचाकी आदळून एक महिला जखमी झाली होती. या गंभीर प्रकाराची ग्रामीण वार्ताने दखल घेत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार ताशेरे ओढले होते. या वृत्ताचा धसका घेत अखेर संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली आणि मंगळवारी सकाळी भर पावसात खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मुसळधार पावसामुळे टाकलेले सिमेंट टिकून राहिले नाही. त्यामुळे प्रशासनाची ही कारवाई म्हणजे कायमस्वरूपी उपाय नसून केवळ मलमपट्टी करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेत नव्याने झालेल्या काँक्रीट रस्त्याला मोठमोठे तडे जाऊन रस्ता खचला आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याची झालेली ही अवस्था पाहून कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भर पावसात हे तडे आणि खड्डे दिसून न आल्याने वाहनचालकांचा जीव धोक्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही याच ठिकाणी तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच रस्ता पुन्हा खचल्याने ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला महामार्ग सुरू होण्यापूर्वीच उखडत असेल, तर पुढील काळात या रस्त्याची काय अवस्था होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
तात्पुरती मलमपट्टी करून जबाबदारी झटकण्याऐवजी संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने नव्याने दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा तसेच संबंधित ठेकेदाराला जाब विचारून चोप देण्याचाही इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
ग्रामीण वार्ताच्या वृत्ताचा धसका ; महामार्गावरील सावर्डे येथील खड्ड्यांवर घाईघाईने मलमपट्टी
Leave a Comment




