चिपळूण : नगर परिषदेने प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरात राबवलेल्या विशेष मोहिमेत गोवळकोट रोड परिसरातील विविध व्यावसायिक आस्थापनांवर धडक कारवाई केली आहे. केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक विरोधात ही कारवाई हाती घेण्यात आली असून, यादरम्यान १७ किलो अवैध प्लास्टिक जप्त करण्यात आले असून संबंधितांकडून एकूण २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात विनापरवाना प्लास्टिक पिशव्यांमध्ये साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
चिपळूण नगर परिषदेच्या वतीने गोवळकोट रोड परिसरातील हॉटेल व्यावसायिक, बेकरी व्यावसायिक, मटण व मच्छी विक्री व्यावसायिक तसेच भाजी व फळे विक्री करणाऱ्यांच्या दुकानांना प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन तपासणी करण्यात आली. या मोहिमेत नियम डावलून वापरले जाणारे एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले असून प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव आणि उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आरोग्य विभागामार्फत पार पाडण्यात आली.
या धडक मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य निरीक्षक प्रवीण जाधव, अतिक्रमण विभागाचे संदेश टोपरे, मुकादम दीपक किंजळकर, कार्यालयीन कर्मचारी मनीष जाधव आणि स्वच्छता दूत यांनी विशेष परिश्रम घेतले. चिपळूण शहरात पर्यावरण संवर्धनासाठी आणि प्लास्टिकमुक्त शहराचे लक्ष्य गाठण्यासाठी नगर परिषदेतर्फे अशीच कडक भूमिका यापुढेही कायम ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





