सावर्डे / विनायक सावंत : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील सावर्डे परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनचालकांचा जीव रोज धोक्यात घातला जात आहे. महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि उखडलेल्या रस्त्यामुळे अपघातांची मालिका सुरू असतानाही संबंधित अधिकारी आणि ठेकेदार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही केवळ दिखाऊ दुरुस्ती केली जात आहे. गेल्या दीड महिन्यात दोनदा खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले, मात्र ते इतक्या निकृष्ट दर्जाचे होते की काही दिवसांतच रस्ता पुन्हा उखडून खड्ड्यांनी भरला. आरती स्वीटसमोरील भरलेले खड्डे अवघ्या तीन दिवसांतच पुन्हा उघडे पडल्याने ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्डे दिसतच नाहीत. परिणामी दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकही जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. रोज किरकोळ अपघात घडत असून, एखादी मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कोकणची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र संबंधित यंत्रणेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेण्याचे काम सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा भविष्यात एखादा भीषण अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारावर असेल. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या मृत्यूच्या सापळ्यात बदललेल्या महामार्गाची त्वरित दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे येथे मृत्यूचे खड्डे; निकृष्ट दुरुस्तीचा खेळ, प्रशासन मात्र झोपेत!
Leave a Comment





