चिपळूण शहरातील हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय; ३९ वर्षीय महिलेला अटक, तरुणीची सुटका

Gramin Varta
1279 Views

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी

चिपळूण : शहरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड टाकत कारवाई केली आहे. या प्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून, तिला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण शहरातील मध्यवर्ती भागातील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर हा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या रत्नागिरी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली असता कथित अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलेने मुंबई येथील एका २३ वर्षीय तरुणीला या व्यवसायासाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित तरुणीकडून हा व्यवसाय करवून घेतला जात असल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेत अटक केली. बुधवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर संबंधित तरुणीची सुटका करून तिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून सुरू असून, या कारवाईमुळे शहरातील अनैतिक धंद्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.

Total Visitors :
4654190
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *