पनवेल : पनवेल शहरातून मानवतेला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. खेळत असलेल्या अवघ्या १० वर्षीय चिमुकलीला प्रलोभन दाखवून सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत २४ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला अटक केली असून, त्याच्याविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पीडित चिमुरडी परिसरात खेळत होती. त्यावेळी आरोपीने हातवारे करून तिला जवळ बोलावले आणि सार्वजनिक महिलांच्या शौचालयात नेले. तेथे दरवाजा बंद करून तिच्याशी अश्लील कृत्य करत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, शौचालय परिसरातील संशयास्पद हालचाली एका स्थानिक नागरिकाच्या निदर्शनास आल्या. संशय आल्याने त्यांनी तातडीने शौचालयाचा दरवाजा ठोठावत आत काय सुरू आहे, अशी विचारणा केली. आवाज ऐकून परिसरातील इतर नागरिकही घटनास्थळी धावले. नागरिकांनी दरवाजा उघडण्याचा आग्रह धरताच आतून घाबरलेल्या अवस्थेतील चिमुकली बाहेर आली, तर आरोपी दरवाजामागे लपण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
घटनेचा प्रकार समजताच संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणे, शौचालय परिसर आणि कमी वर्दळीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि बालकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
संतापजनक! २४ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने १० वर्षांच्या चिमुकलीला शौचालयात नेऊन केला अत्याचार; आरोपीला ठोकल्या बेड्या
Leave a Comment





