मुंबई : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले.
त्यानुसार ५ ते २२ ऑगस्टदरम्यान पहिली फेरी राबविण्यात येणार आहे. यामध्येही अखिल भारतीय कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रियेला ५ जुलैपासून तर राज्य कोट्यांतगर्त प्रवेश प्रक्रिया १३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालये यंदा ८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. पेपरफुटी प्रकरणानंतर घेण्यात आलेल्या पुनर्परीक्षेमुळे प्रवेश प्रक्रियेला यंदा गतवर्षीच्या तुलनेत १६ दिवस विलंब झाला आहे, तर महाविद्यालये सात दिवस विलंबाने सुरू होणार आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली नीट यूजी पुनर्परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला. त्यानंतर वैद्यकीय समुपदेशन समतीकडून तातडीने प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात येत आहे. त्यानंतर अखिल भारतीय आणि राज्य कोट्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समितीने वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार ४ ऑगस्ट रोजी संस्थानिहाय जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर अखिल भारतीय कोटा, डिम्ड विद्यापीठ आणि केंद्रीय विद्यापीठासाठी समुपदेशानाची पहिली फेरी ५ ते २२ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहे. ५ ते १२ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी, आणि शुल्क भरायचे आहे. ६ ते १३ ऑगस्ट या कालावधीत पसंतीक्रम भरून अर्ज निश्चित करायचा आहे. १७ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. १८ ते २२ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय कोट्याच्या दुसरी समुपदेशन फेरी २४ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना ३ ते ८ सप्टेंबर या कालावधती प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तिसरी समुपदेशन फेरी ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान असून, विद्यार्थ्यांना १९ ते २६ या कालावधीत महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे आहेत.
वेळापत्रकादरम्यान शनिवार, रविवार आणि अन्य सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या तसेच वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना एनएमसीकडून सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांमधील समुपदेशन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज्य कोट्यांतर्गत फेरी १३ ऑगस्टपासून सुरू होणार
राज्य कोट्यांतर्गत पहिली समुपदेशन फेरीला १३ ते २८ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या समुदेशन फेरीमधील विद्यार्थ्यांना २८ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दुसरी फेरी ३१ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान आणि तिसरी फेरी १६ ते १ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
मुक्त समुपदेशन (स्ट्रे) फेरी २२ ते २९ सप्टेंबरदरम्यान
अखिल भारतीय काेट्यासाठी मुक्त समुपदेशन फेरी २८ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. तर राज्य कोट्यासाठी ३ ते १० ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या दोन्ही कोट्यांतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १० ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.






