मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी एसआयटीची स्थापना

Gramin Varta
35 Views

पुणे: मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.या पथकामार्फत दुर्घटनेमागील कारणे, संबंधितांची जबाबदारी आणि सुरक्षेतील त्रुटींचा सर्वंकष तपास केला जाणार आहे.

मोशी कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी कचऱ्याचा डोंगर वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले होते. बचाव आणि शोधकार्याकरिता एनडीआरएफ, भारतीय सैन्य, अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासनाने सलग चार दिवस संयुक्त मोहीम राबविली होती. दुर्घटनेनंतर पोलिसांनी अँटोनी लारा रिन्यूएबल कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय राज्य शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली असून, त्या समितीकडूनही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.

दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास अधिक प्रभावी आणि सर्वंकष करण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. या पथकाचे नेतृत्व पोलीस उपायुक्त करणार असून, त्यामध्ये दोन सहायक पोलीस आयुक्त, एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, एक फौजदार आणि चार पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. एसआयटीकडून दुर्घटनेतील तांत्रिक बाबी, सुरक्षेच्या उपाययोजना आणि संबंधितांची जबाबदारी यांचा सखोल तपास करून अहवाल तयार करण्यात येणार आहे.

Total Visitors :
4618057
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *