निसर्गाचा उलटा चमत्कार! बेडकानेच फणाधारी नागाच्या पिलाला पकडलं; सर्पमित्रांनी दिलं जीवदान

Gramin Varta
192 Views

छत्रपती संभाजीनगर : साप किंवा नाग हा बेडकाची शिकार करतो, हे सर्वश्रुत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरात याच्या अगदी विरुद्ध आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. एका मोठ्या बेडकाने चक्क फणाधारी नागाच्या पिलालाच तोंडात पकडल्याचा दुर्मीळ प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

रविवारी शहरातील बीड बायपास परिसरातील डायकोर्ट कॉलनी येथे सुमारे एक ते दीड फूट लांबीचे नागाचे पिल्लू एका मोठ्या बेडकाच्या तावडीत अडकल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. बेडकाने नागाच्या पिलाला घट्ट पकडून ठेवले होते. सुटकेसाठी नागाचे पिल्लू धडपड करत होते, मात्र बेडूक त्याला सोडण्यास तयार नव्हता. हा अनोखा प्रकार पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी जमली.

घटनेची माहिती मिळताच लाइफ केअर अॅनिमल असोसिएशनचे सर्पमित्र दाऊद शेख तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि कोणतीही इजा न होऊ देता बेडकाच्या तावडीतून नागाच्या पिलाची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर बेडूक आणि नागाचे पिल्लू या दोघांनाही सुरक्षितपणे सातारा परिसरातील डोंगराळ भागात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निसर्गात कधीकधी अशा विरळा आणि विरोधाभासी घटना घडत असतात. साप हा बेडकाची शिकार करतो, अशी सर्वसामान्य धारणा असताना बेडकानेच नागाच्या पिलाला पकडल्याची ही घटना अनेकांसाठी आश्चर्याचा विषय ठरली आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4631787
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *