दापोलीत ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण; कटर ब्लेड घेऊन जीवे मारण्याची धमकी

Gramin Varta
314 Views

दापोली : प्रवासी वाहतूक व्यवसायाच्या वादातून एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण करून कटर ब्लेडने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दापोली तालुक्यातील फणसू नाका येथे २० ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिष दत्ताराम शिगवण (वय ३६, व्यवसाय ट्रॅव्हल्स, रा. मगीज मांडवकरवाडी, ता. दापोली) हे मुंबईहून प्रवाशांना घेऊन दापोली येथे आले होते. प्रवाशांना दापोली येथे उतरवल्यानंतर ते आपल्या मालकीची टेम्पो ट्रॅव्हल्स घेऊन मित्राच्या घरी आराम करण्यासाठी निघाले होते.

दरम्यान, २० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता ते फणसू नाका येथे आले असता त्यांनी रस्त्याच्या बाजूला टेम्पो ट्रॅव्हल्स उभी केली. त्यावेळी आरोपी रवि किरण उके (रा. फणसू, ता. दापोली) तेथे आला. त्याने या ठिकाणी प्रवासी गाडीत भरायचे नाहीत, तसेच वाकवली गावाच्या पुढे येऊ नये, असे सांगून शिगवण यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

वाद वाढल्यानंतर शिगवण यांनी उगाच भांडण करू नको, असे सांगितल्याने आरोपी संतप्त झाला. त्यानंतर त्याने हातातील बांबूने शिगवण यांच्या दोन्ही पायांवर, कंबरेवर, मांडीवर, पोटरीवर, दोन्ही हातांवर तसेच डोक्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे.

इतकेच नव्हे तर आरोपीने शिवीगाळ करत हातातील कटर ब्लेड घेऊन शिगवण यांच्या अंगावर मारण्यासाठी धाव घेतली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीत शिगवण जखमी झाले आहेत.

या प्रकरणी २० ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(२), ३५१(२), ३५२, १३१ तसेच संबंधित जुन्या कायद्यातील नमूद कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4745459
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *