मावळ : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात प्रसूतीदरम्यान ३८ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नवजात बाळाचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील उपचारपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत उपचारातील हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.
रूपाली सोमनाथ इंदलकर (वय ३८, रा. कुसगाव, ता. मावळ) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १८) दुपारी रूपाली यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना मायमर रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर सायंकाळी सुमारे पाच वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी तातडीने प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी सुमारे सहा वाजता प्रसूती करण्यात आली. मात्र, प्रसूतीदरम्यानच रूपाली इंदलकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आईच्या मृत्यूनंतर नवजात बाळाचीही प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री सुमारे नऊ वाजता बाळाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. त्यामुळे अवघ्या काही तासांतच आई आणि नवजात बाळ दोघांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार केल्याचा नातेवाइकांचा आरोप
या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाइकांनी मायमर रुग्णालयाच्या उपचारपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. गंभीर परिस्थितीत आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर वेळेत उपलब्ध होते का, उपचारांची प्रक्रिया वैद्यकीय निकषांनुसार पार पडली का आणि रुग्णाला आवश्यक त्या सुविधा वेळेत मिळाल्या का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, गंभीर स्थितीत असतानाही शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत वैद्यकीय चौकशी होणे आवश्यक आहे.
कार्डियाक रुग्णवाहिकेऐवजी साध्या रुग्णवाहिकेचा आरोप
नवजात बाळाला ससून रुग्णालयात हलविताना कार्डियाक सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिकेऐवजी साध्या रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आल्याचा आरोपही नातेवाइकांनी केला आहे. गंभीर अवस्थेतील नवजात बाळाच्या स्थलांतरादरम्यान आवश्यक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित कर्मचारी आणि जीवनरक्षक सुविधा रुग्णवाहिकेत उपलब्ध होत्या का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आईचा प्रसूतीदरम्यान मृत्यू आणि त्यानंतर नवजात बाळाचा मृत्यू या दुहेरी आघातामुळे इंदलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमागे नेमके वैद्यकीय कारण काय होते, उपचारात कोणती प्रक्रिया अवलंबण्यात आली आणि कुठे त्रुटी झाल्या का, याचा निष्पक्ष तपास झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल वैद्यकीय चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाइकांनी केली आहे.
नियतीचा घाला! प्रसूतीदरम्यान शिक्षिकेचा मृत्यू, नवजात बाळानेही सोडले प्राण; उपचारांवर नातेवाइकांचे गंभीर आरोप
Leave a Comment




