भांबेड येथील निसर्गात रमले सह्याद्रीचे कलाकार !

Gramin Varta
167 Views

पावसाळी सहल डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांच्या निसर्गरम्य निवासस्थानी ; विद्यार्थ्यांनी घेतली पुरातन संग्रहाची माहिती
     
संगमेश्वर : कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी पावसाळी शैक्षणिक सहल यावर्षी लांजा तालुक्यातील निसर्गरम्य भांबेड येथे उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात जाऊन चित्रकलेचे प्रत्यक्ष धडे मिळावेत, निसर्गातील बारकावे अनुभवता यावेत आणि त्याचे कलात्मक रूपांतर करता यावे, या उद्देशाने या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात अशा निसर्गरम्य व ऐतिहासिक ठिकाणी विद्यार्थ्यांना नेले जाते. प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात जाऊन विद्यार्थी तेथील डोंगर, झाडे, भातशेती, घरे, रस्ते, पावसाळी वातावरण, नदी-नाले, मानवी जीवन तसेच निसर्गातील प्रकाश-सावली आणि विविध रंगछटा यांचा अभ्यास करतात. त्यानुसार विद्यार्थ्यांनी भांबेडच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेत विविध विषयांवर चित्रे व रेखाटने साकारली.

यावर्षी भांबेडची निवड ही विशेष महत्त्वाची ठरली. कोकणच्या हिरवाईने नटलेले डोंगर, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य, भातशेती, पारंपरिक कोकणी जीवनशैली आणि निसर्गातील मनमोहक रंगछटा यामुळे विद्यार्थ्यांना चित्रकला आणि निसर्ग निरीक्षणासाठी समृद्ध विषय मिळाला. भांबेड हे कलाक्षेत्राशीही जोडलेले गाव असून, प्रसिद्ध चित्रकार बाळ ठाकूर अर्थात भालचंद्र शिवराम ठाकूरदेसाई यांचे हे जन्मगाव आहे. त्यांनी मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलाशिक्षण घेतले असून मराठी साहित्यविश्वातील अनेक पुस्तकांच्या मुखपृष्ठ व रेखाटनाच्या कामातून आपली स्वतंत्र कलाशैली निर्माण केली. त्यामुळे भांबेडच्या भूमीत विद्यार्थ्यांना निसर्गाबरोबरच कलाविषयक प्रेरणेचाही अनोखा अनुभव मिळाला. बाळ ठाकूर यांच्या कलाजीवन कार्याचा आढावा यावेळी त्यांचे चिरंजीव ठाकूर यांनी घेत मुलांना मार्गदर्शन केलं.

या शैक्षणिक सहलीचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे मूळचे भांबेडचे रहिवासी असलेले डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांनी दिलेली भेट. डॉ. ठाकूरदेसाई हे न्यूरोसर्जन असून देश-विदेशात कार्यरत असतानाही आपल्या मूळ गावाशी त्यांचे नाते त्यांनी जपले आहे. भांबेड येथील त्यांच्या शेती-बागायतीत आंबा व फणसांच्या विविध जातींची लागवड असून, जुन्या व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांनी आपल्या घरी जपलेल्या शिल्पांचा व कलावस्तूंच्या ठेव्याचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दर्शन घडविले. या शिल्पसंग्रहातून विद्यार्थ्यांना शिल्पकलेतील आकार, प्रमाण, रचना, पोत, सौंदर्यदृष्टी आणि कलात्मक मांडणी यांचा प्रत्यक्ष अभ्यास करता आला. त्यामुळे ही शैक्षणिक सहल केवळ निसर्गचित्रणापुरती मर्यादित न राहता निसर्ग, शिल्प, इतिहास आणि कला यांचा सुंदर संगम ठरली.
या सहलीदरम्यान प्रसिद्ध चित्रकार विष्णू परीट यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष चित्रकलेचे प्रात्यक्षिक देत मार्गदर्शन केले. निसर्गचित्रण करताना विषयाचे निरीक्षण, योग्य रचना, प्रकाश-सावली, रंगछटा आणि निसर्गातील वातावरण चित्रामध्ये कसे उतरवावे, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना निसर्गचित्रणाची प्रक्रिया जवळून समजून घेण्याची संधी मिळाली.

प्राचार्य माणिक यादव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांसोबत विविध माध्यमांत चित्रे व शिल्पे साकारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधील बारकावे समजून घेत त्यांच्या चित्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यातील भांबेडच्या निसर्गरम्य वातावरणात प्रत्यक्ष चित्रकला, शिल्पकला, निसर्गनिरीक्षण आणि अनुभवी कलाकारांचे मार्गदर्शन असा कलाशिक्षणाचा अनोखा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. निसर्गातील प्रत्येक घटकाकडे कलात्मक दृष्टीने पाहण्याची आणि त्याचे कागदावर अथवा शिल्पाच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना या सहलीतून मिळाली.

या सहलीचा आस्वाद घेण्यासाठी कलेची ओढ असणारे कलारसिक तसेच महाविद्यालयाला वेळोवेळी नवनवीन उपक्रमांसाठी पाठिंबा व मार्गदर्शन करणारे प्रमुख उपस्थिती कलाशिक्षक-पत्रकार-लेखक जे. डी. पराडकर हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व कलाकृतींचे तोंडभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी कलाकृती साकारण्याबरोबरच भांबेडच्या निसर्गरम्य वातावरणाचा मनसोक्त आनंद लुटला. निसर्गाच्या सानिध्यात प्रत्यक्ष कलाशिक्षण, ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन, शिल्पसंग्रहाचे दर्शन आणि भांबेडच्या कलावैभवाचा परिचय अशा विविधांगी अनुभवांनी यावर्षीची सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टची पावसाळी शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली.विद्यार्थ्यांसमवेत प्रा. रुपेश सुर्वे, अवधूत खातू, विक्रांत बोथरे तसेच दिलीप मामा उपस्थित होते.

सह्याद्रीत कलाकार घडतायत हे अभिमानास्पद

सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालय हे कोकणातील एक प्रयोगशील कला महाविद्यालय आहे. आपण या महाविद्यालयाला भेट देवून येथील कलाकृती आणि विद्यार्थ्यांची मेहनत पाहिली आहे. येथे घडणारे कलाकार भविष्यात स्वतःची उत्तम प्रगती करत आहेत ही बाब कोकणसाठी अभिमानास्पद आहे. कलाविद्यार्थ्यांनी विविध प्रयोग करत स्वतःला आपल्या कामात नेहमी गुंतवून ठेवावे . -डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई, भांबेड

कलासंग्रह पाहून विद्यार्थी भारावले

डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांच्या सारखी एखादी कलाप्रेमी व्यक्ती स्वतःच्या घरात दुर्मिळ अनेक गोष्टींचा संग्रह करते आणि हा अनमोल ठेवा कलारसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देते, ही बाब कलारसिकांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद आहे. आपल्या कलात्मक वास्तूसह घरातील दुर्मिळ गोष्टी माहितीसह विद्यार्थ्यांना सांगून  डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांनी कलेचा वारसा जपण्याचा जणू वसाच घेतला आहे. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी पावसाळी सहलीच्या निमित्ताने जे सहकार्य केलं ते अनमोल होतं. सह्याद्री शिक्षण संस्था यासाठी कृतज्ञ आहे. – प्रकाश अर्जुन राजेशिर्के, ज्येष्ठ चित्रकार – शिल्पकार

Total Visitors :
4745459
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *