देवरुखच्या जिल्हा परिषद शाळेत ‘साप मित्र – मानवाचा’ उपक्रम संपन्न

Gramin Varta
4 Views

देवरुख (प्रतिनिधी) : नागपंचमीनिमित्त देवरुख येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ३ मध्ये ‘साप मित्र – मानवाचा’ या पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी शास्त्रशुद्ध माहिती निर्माण करून त्यांच्याबाबत असलेले गैरसमज आणि अनाठायी भीती दूर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.

या उपक्रमासाठी सर्पमित्र नंदकिशोर (अण्णा) बेर्डे यांना विशेष मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विषारी, निमविषारी आणि बिनविषारी साप यांमधील फरक समजावून सांगितला. तसेच सापांचे पर्यावरणातील महत्त्व आणि निसर्गाचा समतोल राखण्यात त्यांची भूमिका याबाबत माहिती दिली.

साप दिसल्यास घाबरून न जाता कोणती काळजी घ्यावी, सुरक्षित अंतर कसे राखावे आणि सर्पमित्रांशी तातडीने कसा संपर्क साधावा, याचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. सापांना मारण्याऐवजी त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे सर्पमित्र नंदकिशोर बेर्डे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दुर्वा मोघे, मुख्याध्यापिका सौ. कृतिका सावंत तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मांडवकर यांनी केले.

नागपंचमीच्या निमित्ताने पारंपरिक श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयीची भीती कमी होऊन सापांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली.

Total Visitors :
4717923
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *