संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे आणि शेळी गट वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Gramin Varta
281 Views

देवरूख/ सिकंदर फरास : संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद सेस योजना २०२६-२७ अंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या मोहिमेत ५० टक्के अनुदानावर एक दुधाळ गाय किंवा म्हैस, ५० टक्के अनुदानावर शेळी गट ज्यामध्ये पाच शेळ्या आणि एक बोकड समाविष्ट आहे, तसेच ९० टक्के अनुदानावर रबर मॅट पुरवठा करण्यात येणार आहे. या सर्व कल्याणकारी योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे.

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२६ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. या निर्धारित मुदतीत नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे गरजेचे आहे. योजनेची सविस्तर माहिती, अटी आणि अर्ज करण्याच्या पद्धतीबाबतचा संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी नागरिकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात किंवा पंचायत समिती संगमेश्वर अंतर्गत येणाऱ्या तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय, देवरूख येथे संपर्क साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ग्रामपातळीवर आणि ग्रामसभेच्या माध्यमातून या योजनांची सखोल माहिती पोहोचवून व्यापक प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी आणि पशुपालकांनी या अनुदानाचा लाभ घेऊन आपल्या जोडधंद्याला बळ द्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त तथा तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय संगमेश्वर आणि पंचायत समिती संगमेश्वरचे गटविकास अधिकारी यांनी  केले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4693420
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *