संगमेश्वर / दिनेश अंब्रे : संगमेश्वर तालुक्यातील तेरे-बुरंबी येथील युवा गणेशमूर्तिकार शिवम संदेश शिवलकर यांनी आपल्या वडिलांकडून आणि आजोबांकडून मिळालेला गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शाडू मातीपासून सुबक आणि देखण्या गणेशमूर्ती घडविण्याबरोबरच रंगकलेतही त्यांनी कौशल्य आत्मसात केले असून, त्यांच्या कलाकृतींना परिसरातून चांगली मागणी मिळत आहे.
तेरे-बुरंबी येथील प्रतिष्ठित नागरिक आणि सुप्रसिद्ध गणेशमूर्तिकार कै. संदेश भाई मनोहर शिवलकर यांचे सुपुत्र असलेले शिवम गेल्या सात वर्षांपासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्ती घडविणे, रंगकाम आणि इतर कलाकुसरीचे काम शिकत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी वडील संदेश शिवलकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने कुटुंबासह त्यांच्या कलेच्या परंपरेची जबाबदारीही शिवम यांच्या खांद्यावर आली.
या कठीण प्रसंगातून सावरत शिवम यांनी आपल्या कलेची साधना सुरू ठेवली आहे. अनघा संदेश शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ते १५० हून अधिक गणेशचित्रे आणि विविध कलाकृती साकारत आहेत. त्यांच्या चित्रशाळेत पेशवा, लालबागचा राजा, बाळूमामा, दगडूशेठ यांसह विविध स्वरूपातील गणेशमूर्ती आकर्षक पद्धतीने घडविण्यात आल्या आहेत.
शिवम यांच्या हातून एक फुटापासून पावणेचार फुटांपर्यंतच्या विविध आकारांच्या गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्तींची रचना आणि स्वरूप ठरवून त्या हस्तकौशल्याने घडविण्याचा प्रयत्न ते करतात. देवरुख, भादगाव, आंबेड, तेरे, माबळे, लोंढे आदी परिसरातून त्यांच्या मूर्तींना मागणी होत आहे.
विशेष म्हणजे, शिवम यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असूनही आपल्या कुटुंबाच्या पारंपरिक कलेला त्यांनी तितकेच महत्त्व दिले आहे. त्यांच्या कुटुंबातील या गणेशमूर्ती कलेला तब्बल १५ वर्षांची परंपरा लाभली आहे. आजोबा कै. मनोहर तुकाराम शिवलकर (नावडी) यांनी जोपासलेली कला वडिलांनी पुढे नेली आणि आता त्याच कलेचा वारसा शिवम समर्थपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आधुनिक शिक्षण आणि पारंपरिक कलेचा सुंदर संगम साधत शिवम यांनी युवकांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. बदलत्या काळात पारंपरिक कलांना जिवंत ठेवण्यासाठी युवकांनी पुढे यावे, याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्या कलाप्रवासाकडे पाहिले जात आहे.
शिवम शिवलकर यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या मनमोहक गणेशमूर्तींचे संगमेश्वर, तेरे-बुरंबी आणि परिसरातून कौतुक होत असून, पित्याने जोपासलेली कला पुढे नेण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
वडिलांचा कलेचा वारसा जपत शिवम शिवलकरची गणेशमूर्ती कलेत भरारी; ‘युवा कलारत्ना’ची संगमेश्वरात सर्जनशील ओळख
Leave a Comment




