मुंबई : मुंबईतील माहीम परिसरातून अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यानंतर एका १३ वर्षीय मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे तिचे हात व तोंड बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरोधात माहिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १८ जून रोजी माहीम परिसरातील एका नामांकित शाळेजवळ ही घटना घडल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर बाहेर पडली असता, तिच्या ओळखीच्या १६ वर्षीय मुलाने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. त्यानंतर तिला एका निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे आणखी एक अल्पवयीन मुलगा उपस्थित होता.
आरोपानुसार, दोघांनी मिळून मुलीचे हात आणि तोंड बांधले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतरही तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडित मुलीचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिची बदनामी करण्याची धमकी आरोपींनी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या धमक्यांमुळे मुलगी काही काळ मानसिक तणावाखाली होती. मात्र, अखेर तिने धाडस करून घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलीने सांगितलेली घटना ऐकून पालकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने माहिम पोलीस ठाणे गाठून दोन्ही मुलांविरोधात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी भाभा रुग्णालयात करून घेतली. दोन्ही संशयित अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरोधात कायद्यानुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेने मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या मुलीला लक्ष्य करून तिच्यावर अत्याचार झाल्याच्या आरोपाने पालकांमध्येही चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास माहिम पोलीस करत असून घटनेशी संबंधित सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
शाळा सुटली… पण घरी पोहोचण्याआधीच नराधमांचा डाव! १३ वर्षीय चिमुरडीला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार
Leave a Comment




