साखरपा/ सिकंदर फरास : आंबा घाट बंद असल्यामुळे कोल्हापूरकडून येणारी एसटी बससेवा आधीच ठप्प झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत प्रवाशांना योग्य मार्गदर्शन आणि माहिती मिळणे अत्यंत गरजेचे असताना, देवरुख डेपो अंतर्गत येणाऱ्या साखरपा बस स्थानकावर आज एकही जबाबदार अधिकारी किंवा कंट्रोलर उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. या अनागोंदी कारभारामुळे बसची माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून, एसटी महामंडळाच्या या भोंगळ कारभाराबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आंबा घाट बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरहून कोकणात येणाऱ्या बसेस बंद आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांना पर्यायी मार्गाची किंवा बसेसच्या वेळेची अचूक माहिती मिळण्याची गरज होती. मात्र, भाजपचे माजी सरचिटणीस आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित केतकर हे बससंदर्भात चौकशी करण्यासाठी थेट कंट्रोलर रूममध्ये गेले असता, तिथे कोणीही संबंधित कर्मचारी हजर नसल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे, या नियंत्रण कक्षातील संगणकही पूर्णपणे बंद अवस्थेत आढळले.
सकाळपासून बस स्थानकाचे कामकाज प्रत्यक्षात सुरू होते की नाही, असा गंभीर सवाल या निमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. जर अधिकारी आणि कर्मचारीच जागेवर नसतील, तर प्रवाशांनी हक्काची माहिती कुणाकडून आणि कशी घ्यावी? असा संतप्त सवाल अमित केतकर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे स्थानकावरील प्रवाशांचा खोळंबा झाला असून एसटी प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.संबंधित वरच्या प्रशासनाने या प्रकारची गंभीर दखल घेऊन साखरपा बस स्थानकावरील या बेजबाबदार कारभाराची तातडीने चौकशी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांमधून आणि प्रवाशांमधून होत आहे.



