रत्नागिरीत खळबळ : आजारपणाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Gramin Varta
333 Views

रत्नागिरी / प्रतिनिधी : रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे-घारपूरेवाडी येथे मंगळवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. दीर्घकाळापासून आजारपणाचा त्रास सहन करणाऱ्या ६४ वर्षीय वृद्धाने आपल्या परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे घारपूरेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माधव विष्णू आठवले (वय ६४, रा. घारपूरेवाडी, कोतवडे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठवले हे गेल्या काही दिवसांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त होते. आजारपणामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीत ही घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील त्यांचे पुतणे प्रसाद पांडुरंग आठवले (वय ४२) यांनी तत्काळ त्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी माधव आठवले हे गंभीर अवस्थेत आढळून आले. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

या घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत. कोतवडे-घारपूरेवाडी येथील या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Total Visitors :
4718296
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *