चिपळूण बसस्थानकाचे काम  ९ वर्षे रखडले, प्रवाशांना करावा लागतोय गैरसोयींचा सामना

Gramin Varta
76 Views

चिपळूण: तब्बल नऊ वर्षांपूर्वी सुरू झालेले चिपळूणच्या बहुचर्चित हायटेक बसस्थानकाचे काम अद्याप सुमारे ५० टक्के पूर्ण आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सावासाठी चिपळूणला येणाऱ्या आणि चिपळूणमधून जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः, पावसाळा सुरू असल्याने हजारो प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. स्थानकाचे काम अजूनही संथगतीने सुरू आहे.

दोन महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चिपळूण बसस्थानकाच्या कामाची पाहणी करून कामाला वेग देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, मंत्र्यांच्या पाहणीनंतरही कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कितपत झाली, हाच प्रश्न आहे. चिपळूण हे कोकणातील महत्त्वाचे मध्यवर्ती वाहतूक केंद्र आहे. गणेशोत्सावाच्या काळात मुंबई, पुणे तसेच राज्यातील विविध भागातून हजारो चाकरमानी चिपळूणमागे आपल्या गावाकडे रवाना होतात. त्यामुळे या काळात बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होते.

परिवहन मंत्र्यांच्या पाहणीनंतर कामाला वेग येईल आणि गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, कामाची सद्यस्थिती पाहता ही अपेक्षा पूर्ण होणार का, असा प्रश्न आहे. उर्वरित कामाची निविदा कधी निघणार, प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आणि संपूर्ण बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार, याकडे आता चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सावाच्या काळात चिपळूणमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठी पावसापासून संरक्षण, बसची प्रतीक्षा करण्यासाठी पुरेशी जागा आणि इतर मूलभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, स्थानकाचे काम अपूर्ण राहिल्यास पावसाْतच बसची प्रतीक्षा करण्याची वेळ प्रवाशांवर येण्याची शक्यता आहे.

गेली काही वर्षे हे चाकरमानी बसस्थानक अपूर्ण असल्याचा त्रास सहन करत आहेत. यंदाही त्यांना त्याच समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

या हायटेक बसस्थानकाच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालय उभारणीसह काही महत्त्वाची कामे अद्याप बाकी आहेत. विशेष म्हणजे, या कामाची निविदाही अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. एकीकडे परिवहन मंत्र्यांनी काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असताना दुसरीकडे उर्वरित कामाची निविदा प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने हे काम पूर्ण होण्यासाठी प्रवाशांना आणखी बराच काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सावाच्या गर्दीचा विचार करून एस.टी. प्रशासनाने उर्वरित कामांना गती देणे आवश्यक आहे. किमान गणेशोत्सवापूर्वी प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाने ठोस नियोजन करावे, अशी मागणी प्रवासी आणि चाकरमान्यांकडून होत आहे.

Total Visitors :
4718639
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *