चिपळूण रेल्वे तिकीट खिडकी घराची इमारत जीर्ण अवस्थेत; तर खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांना होतोय नाहक त्रास!

Gramin Varta
70 Views

चिपळूण : चिपळूण शहराकडून रेल्वे स्टेशन नजीकच्या रस्त्याची व तिकीट खिडकी घर इमारतीची दुरावस्था तर पर्यायी अनारक्षित तिकीट घर खिडकी नेहमीच बंद असते. यामुळे प्रवाशांची नाहक गैरसोय होत आहे. या प्रकाराबाबत वाहन चालक तसेच प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोकण रेल्वे कार्पोरेशन महामंडळाने पूर्वी चिपळूण शहर-मुरादपूर दिशेने येणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट घर खिडकी इमारत बांधले. काही महिने या तिकीट घर खिडकीमधून प्रवाशांनी रेल्वे प्रवासाची तिकिटे काढली. या तिकीट घर खिडकीमुळे प्रवाशांची सोय झाली. मात्र , कालांतराने चिपळूण मुरादपूर दिशेकडील तिकीट घर खिडकी बंद झाले. इतकेच नव्हे तर या इमारतीत परप्रांतीय कामगार राहू लागले आहेत. हे कामगार कोणत्या ठेकेदाराचे आहेत?  याचा उलगडा होत नाही. रेल्वे प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करीत आहे. गेली काही वर्ष या इमारतीचा योग्य पद्धतीने वापर होत नसल्याने या इमारतीची दुरावस्था झाली आहे इतकेच नव्हे तर जीर्ण अवस्थेत पोहोचली आहे.

या इमारतीमधील तिकीट खिडकीचा वापर बंद झाल्याने कोकण रेल्वे अन्याय निवारण संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती शौकत मुकादम यांनी या इमारती संदर्भात आवाज उठवला तरीही रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले नाही. यानंतर मुकादम यांनी चिपळूण शहराकडून रेल्वे प्रवाशांसाठी तिकीट घर खिडकीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. याची दखल घेऊन रेल्वे प्रवाशांनी चिपळूण शहराबाजूकडील रेल्वे स्टेशन आवारात तिकीट घर सुरू केले. काही दिवस या तिकीट घरमधून प्रवाशांनी तिकिटे काढली. मात्र सध्या तिकीट घर बंद अवस्थेत आहे. यावरून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची समजूत काढली की काय?  असा सवाल उपस्थित होत आहे.

तर दुसरीकडे चिपळूण शहराकडून मुरादपूरमार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हा रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असल्याने चिखलमय रस्ता झाला आहे. यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्डेमय परिस्थिती बाबत रेल्वे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Total Visitors :
4697454
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *