खेडमध्ये भीषण अपघात : भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

Gramin Varta
192 Views

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथे बुधवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. पेट्रोल पंपाकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजेश मोहिते यांच्यासह त्यांच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. कारचालकालाही किरकोळ दुखापत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश मोहिते हे महिलेसह दुचाकीवरून भरणे शिंदेवाडी परिसरातील पेट्रोल पंपाकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकी तसेच कारचे सुटे भाग महामार्गावर दूरपर्यंत विखुरले.

दुचाकीला धडक दिल्यानंतर कार महामार्गालगत असलेल्या कठड्यावर जाऊन आदळली. या धडकेत कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारचालकाला किरकोळ दुखापत झाली असून, अपघातात दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच जय हिंद रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्राथमिक उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेश मोहिते यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

Total Visitors :
4697070
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *