खेड नगरपरिषद व अल सफा वेलफेअर फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; ८ हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
खेड (प्रतिनिधी) : पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी खेड नगरपरिषदेने शहरात सिंगल युज प्लास्टिकविरोधात कठोर भूमिका घेत ‘प्लास्टिकमुक्त खेड’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. या अभियानाला सामाजिक संस्थांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अल सफा वेलफेअर फाउंडेशनने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत नागरिकांना तब्बल ८ हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंगल युज प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नाले तुंबणे, जलप्रदूषण, जनावरांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि कचऱ्याची वाढ ही गंभीर समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशांनुसार खेड नगरपरिषदेने शहरात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी अल सफा वेलफेअर फाउंडेशन पुढे सरसावले आहे. फाउंडेशनच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना ८ हजार कापडी पिशव्या विनामूल्य वितरित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून प्लास्टिकचा वापर कमी करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे.
या उपक्रमासंदर्भातील निवेदन अल सफा वेलफेअर फाउंडेशनचे सर्फराज पांगारकर, शमशूद्दीन खान तसेच नगरसेवक आरिफ मुल्लाजी यांनी खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केले. यावेळी ‘प्लास्टिकमुक्त खेड’ अभियान यशस्वी करण्यासाठी नगरपरिषद आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका मांडण्यात आली.
नगरपरिषदेकडून शहरात प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी, जनजागृती मोहीम, व्यापाऱ्यांशी संवाद तसेच पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही बाजारात खरेदीसाठी स्वतःसोबत कापडी पिशव्या बाळगून प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खेड नगरपरिषदेचा दूरदृष्टीचा निर्णय आणि अल सफा वेलफेअर फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी यामुळे ‘प्लास्टिकमुक्त खेड’ अभियानाला मोठे बळ मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासन, सामाजिक संस्था, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या सामूहिक सहभागातून “प्लास्टिकमुक्त खेड – स्वच्छ, सुंदर आणि हरित खेड” हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.





