खेड : कोकणातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेडच्या चेअरमनपदी खेड शहरातील नामवंत डॉक्टर उपेंद्र तलाठी यांची संस्थेच्या सर्वसाधारण सभेत निवड जाहीर करण्यात आली.
रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलने गेल्या काही वर्षांत गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि स्पर्धा परीक्षांमधील घवघवीत यशाच्या जोरावर कोकणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाळेने जेईई, नीट, सीबीएसई बोर्ड परीक्षा तसेच विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण यामुळे रोटरी स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात आपला नावलौकिक निर्माण केला आहे.
नवनिर्वाचित चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी हे सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याचा समृद्ध अनुभव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी यापूर्वीही विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत अधिक भर पडेल, नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
निवडीनंतर बोलताना डॉ. उपेंद्र तलाठी यांनी, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची गुणवत्ता, शिस्त आणि यशाची परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमधील उत्कृष्ट यश यावर विशेष भर देत पालकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू, असे सांगितले.
डॉ. उपेंद्र तलाठी यांच्या निवडीमुळे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रगतीला नवे बळ मिळेल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून संस्था यापुढेही यशाची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास संस्थेचे पदाधिकारी यांनी व्यक्त केला.





