खेड : मुंबई-गोवा महामार्गालगत खवटी येथील एका घराचे कुलूप हातोड्यासारख्या हत्याराने तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्याची चैन व रोख रक्कम असा एकूण ६० हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खवटी भारतवाडी येथील रहिवासी चंद्रकांत श्रीधर दळवी हे ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप हातोड्यासारख्या हत्याराने तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगेची झडती घेत त्यामधील १२.५० ग्रॅम वजनाची वापरती सोन्याची चैन, किंमत ५९ हजार ५०० रुपये, तसेच १ हजार २५० रुपये रोख रक्कम असा एकूण ६० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी चंद्रकांत दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७१/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१६ वाजता करण्यात आली असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी खेड पोलीस तपास करीत आहेत.
खेड: खवटी येथे घरफोडी; ६० हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास
Leave a Comment





