खेड : समाजात आजही अंत्यसंस्काराच्या विधींमध्ये मुलालाच प्राधान्य देणाऱ्या रूढी-परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, या पारंपरिक चौकटीला छेद देत खेड तालुक्यातील पालांडे कुटुंबातील पाच मुलींनी आपल्या आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी स्वतः पार पाडत स्त्री-पुरुष समानतेचा आणि पुरोगामी विचारांचा संदेश दिला आहे. चार मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला, तर मोठी कन्या ममता मंगेश भोसले यांनी आईला मुखाग्नी देत अंतिम संस्कार केले.
मु. पो. खेड महाडनाका, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील रहिवासी गं. भा. लक्ष्मीबाई तुकाराम पालांडे यांचे २१ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पालांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पाच मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
आईच्या निधनानंतर त्यांच्या पाचही कन्या ममता मंगेश भोसले, सुनयना सुधीर सावंत, ज्योती हरिष मोरे, सुजाता राहूल भोसले आणि निता विक्रम रेपाळे यांनी एकत्र येत अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. अंत्ययात्रेदरम्यान चारही बहिणींनी आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा दिला. तर मोठी कन्या ममता मंगेश भोसले यांनी आईला मुखाग्नी देत अंतिम विधी पूर्ण केला.
ममता भोसले या तिसे शिगवणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आईच्या निधनाचे दुःख मनात असतानाही त्यांनी धैर्याने पुढाकार घेत बहिणींसोबत आईच्या अंतिम संस्काराची जबाबदारी पार पाडली. या निर्णयाला चारही बहिणींनीही पूर्ण साथ दिली.
अंत्यसंस्काराच्या वेळी मुलानेच पार्थिवाला खांदा द्यावा किंवा मुखाग्नी द्यावा, अशी रूढ असलेली पारंपरिक मानसिकता या कुटुंबाने आपल्या कृतीतून नाकारली. मुलगा नसला तरी मुलीही आई-वडिलांच्या शेवटच्या प्रवासाची जबाबदारी तितक्याच कर्तव्यभावनेने पार पाडू शकतात, हा संदेश या बहिणींनी दिला आहे.
शिक्षण, नोकरी आणि विविध क्षेत्रांत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे आई-वडिलांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यापासून त्यांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी पार पाडण्यापर्यंत मुलींची भूमिका समान असू शकते, हे पालांडे कुटुंबाच्या या निर्णयातून अधोरेखित झाले आहे. परंपरेपेक्षा आईप्रती असलेले प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारी यांना प्राधान्य देत पाचही बहिणींनी घेतलेली भूमिका परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
खेड तालुक्यात घडलेल्या या घटनेतून ‘मुलगा-मुलगी समान’ या विचाराला केवळ शब्दांची नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे. पालांडे कुटुंबाच्या या पुरोगामी निर्णयाचे परिसरातून कौतुक होत असून, बदलत्या सामाजिक मानसिकतेचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
स्व. लक्ष्मीबाई तुकाराम पालांडे यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
खेड: रूढी-परंपरांना छेद; पाच मुलींनी पार पाडले आईचे अंत्यसंस्कार
Leave a Comment




