उक्षीच्या तरुणाची खेडमध्ये संस्कारांची शाळा; नोकरी सांभाळून विद्यार्थ्यांना घडविण्याचे सत्यवान जोशी यांचे कार्य

Gramin Varta
126 Views

खेड : आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे पुरेसे नसून त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आणि त्यांना योग्य दिशा मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हीच जाणीव मनात ठेवून रत्नागिरी तालुक्यातील उक्षी या छोट्याशा गावातून खेड येथे स्थायिक झालेल्या सत्यवान जोशी यांनी विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे. विश्व हिंदू परिषदेमार्फत ते विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी सकाळी 9 ते 10 मोफत बाल संस्कार वर्ग घेत असून, आपल्या नोकरीतील व्यस्ततेतून वेळ काढून मुलांना चांगल्या सवयी आणि संस्कार देण्याचे कार्य करत आहेत.

सत्यवान जोशी हे खेड येथील घडशिवाडी येथे राहतात. तर कळंबनी येथील क्षयरोग विभागात वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दिवसभराची शासकीय जबाबदारी पार पाडल्यानंतर मिळणारा वेळ ते स्वतःसाठी कुटुंबासाठी न राखता विद्यार्थ्यांसाठी देत आहेत. मुलांनी चुकीच्या मार्गाला जाऊ नये, त्यांच्यामध्ये शिस्त, चांगल्या सवयी, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी बाल संस्कार वर्गाची सुरुवात केली आहे.

मोबाईल, सोशल मीडिया आणि बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांच्या जडणघडणीवर विविध प्रकारचे परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांना योग्य दिशा देण्यासाठी संस्कारवर्गाची गरज असल्याचे जोशी यांचे मत आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगले विचार रुजवणे, मोठ्यांचा आदर करणे, शिस्त पाळणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखणे, या गोष्टींची शिकवण या माध्यमातून दिली जात आहे.

विशेष म्हणजे या उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोकरीचा व्याप आणि आपले कुटुंब सांभाळून ते मुलांना घडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हीच या उपक्रमाची विशेष बाब ठरत आहे. या कार्यात त्यांना नरेश इदाते यांचीही मोलाची साथ मिळत आहे. त्यांना पत्नी, 2 मुली, वडील, भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. या परिवार मधून वेळ काढून ते संस्कार वर्ग घेतात.

आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता व्यक्त करणारे अनेकजण दिसतात; मात्र प्रत्यक्ष वेळ देऊन त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी पुढाकार घेणारे हात कमी आहेत. सत्यवान जोशी यांनी आपल्या कृतीतून याच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली असून, त्यांच्या या उपक्रमाचे पालक आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Total Visitors :
4669157
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *