दहिवली येथील भूस्खलन दुर्घटनेत बचावकार्यात मोलाचे योगदान देणारे पोलीस निरीक्षक आणि युवक सन्मानित

Gramin Varta
140 Views

रत्नागिरी पोलीस दलातर्फे विशेष गौरव

खेड : तालुक्यातील दहिवली गावातील शेलारवाडी येथे मुसळधार पावसामुळे दिनांक सहा जुलै २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी भूस्खलनाच्या घटनेनंतर राबविण्यात आलेल्या शोध व बचाव कार्यामध्ये धैर्य, तत्परता आणि सेवाभाव दाखविणाऱ्या खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक आहिरे तसेच दहिवली गावातील युवकांचा रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने दिनांक चोवीस जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या दुर्घटनेत काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती आणि घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा पोलीस दल, जिल्हा प्रशासन, एन.डी.आर.एफ. तसेच इतर यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोध व बचाव कार्य सुरु केले होते. या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. विवेक आहिरे, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच दहिवली गावातील युवकांनी तब्बल एकवीस तास अथक परिश्रम घेत शोध व बचाव मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला असून, मुसळधार पाऊस, चिखल आणि जीव धोक्यात घालून केलेल्या त्यांच्या कार्यामुळे बचाव मोहिमेला मोठे बळ मिळाले. या आपत्तीच्या काळात रत्नागिरी पोलीस दलाला खेड येथील युवकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याचे कौतुक करण्यात आले असून, या निःस्वार्थ योगदानाकरिता पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक श्री. विवेक आहिरे, खेड पोलीस ठाणे व दहिवली गावातील युवकांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -
Total Visitors :
4828080
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *